पाकिस्तानमधील खराब आर्थिक स्थिती आणि वाढत्या कर्जामुळे नेत्यांचे सूरही बदलू लागले आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल पाकिस्तानमधील नेते विचारत आहेत. पाकिस्तानमधील नेते आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ)चे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले, भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे, आम्ही दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत.
पडद्याआडून निर्णय घेणाऱ्या अदृश्य शक्ती देशाच्या दुरावस्थेला जबाबदार आहे, ज्यांनी जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना कठपुतळी बनवले आहे. या शक्ती आपल्याला भिंतींच्या आडून नियंत्रित करतात. संसद सदस्य तत्त्वे सोडून लोकशाही विकण्यात व्यस्त आहेत. आपण दिवाळखोरीत चाललो आहोत, याला जबाबदार कोण? असा सवाल मौलाना फजलुर रहमान यांनी केला आहे.
मौलाना फजलुर रहमान निवडणुकीनंतर नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आम्ही किती दिवस तडजोड करत राहणार? किती दिवस आपण खासदार म्हणून निवडून येण्यासाठी बाहेरच्या शक्तींची मदत घेत राहणार? असे मौलाना म्हणाले. तसेच, 2018 आणि 2024 च्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचा त्यांनी निषेध केला. याशिवाय, आपण आपल्या देशाला स्थिरतेचा बळी बनवले आहे, असे देश प्रगती करू शकत नाहीत, असे मौलाना यांनी सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे पाकिस्तानातील काही उद्योगपतींचे मत आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील शेअर बाजारातील दिग्गज आणि व्यावसायिक आरिफ हबीब यांनी याबाबत म्हटले होते की, भारत आणि पाकिस्ताने हातमिळवणी केली पाहिजे. तसेच, अदियाला तुरुंगात बंद असलेल्या व्यक्तीशी संबंध सुधारावेत, जेणेकरून ते गोष्टी सुधारतील. दरम्यान, अदियाला तुरुंगात बंद असलेला व्यक्ती म्हणजे माजी पंतप्रधान इम्रान खान असा त्यांचा संदर्भ होता.