नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जगभरात रशियाविरोधात अमेरिकेसह नाटो देशांनी टीका सुरू केली आहे. भारत हा रशियाचा जुना मित्र असल्याने अद्याप यूक्रेन युद्धात भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. भारतानं रशियावर टीका करावी यासाठी अमेरिका भारतावर दबाव आणत आहे. जागतिक पातळीवर भारतानं रशियाविरुद्ध उभा राहावं अशी अमेरिकेची इच्छा आहे. परंतु भारताने या प्रकरणी थेट भूमिका घेतली नाही. भारतानं तटस्थ राहत शांतता पाळण्याचं आवाहन केले आहे.
यातच मूळ भारतीय असलेले अमेरिकेचे खासदार रो खन्ना म्हणाले आहे की, रशियानं यूक्रेनवर जो आक्रमक हल्ला केला आहे त्यावर भारताला ठोस भूमिका घ्यावी लागेल. भारताला रशिया अथवा चीनकडून तेलही खरेदी करायला नको. आता भारत नेमका कुणाच्या बाजूने आहे? याचा ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले. हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिवच्या सिलिकन व्हॅली येथे प्रतिनिधित्व करणारे रो खन्ना रशियाबाबत भारताच्या भूमिकेवर टीका करत आहेत.
मी भारतावर स्पष्ट बोलतो, भारताने पुतिन यांचा निषेध नोंदवला पाहिजे. भारताने चीन अथवा रशियाकडून तेल खरेदी करू नये. पुतिन यांना रोख लावण्यासाठी जगाला एकजूट व्हायला हवं. जेव्हा चीनने भारताविरोधात आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा अमेरिका भारतासोबत उभी राहिली. पुतिन नाही. भारताने अमेरिकेकडून शस्त्र खरेदी करावीत रशियाकडून नाही. ही प्रक्रिया सुलभ कशी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका सहकारी मित्रांच्या नात्याने भारताची गरज आहे असं खासदार रो खन्ना यांनी सांगितले.
रो खन्ना हे भारत-अमेरिका कॉकसचे उपाध्यक्षही आहेत. कॉकस हे भारत-अमेरिकेतील संबंध वाढवण्यासाठी धोरणात्मक मदत करते. सर्वात आधी भारताने संयुक्त राष्ट्रात मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याने पुतिन यांचा निषेध करावा. त्याचसोबत भारताने हे ठरवलं पाहिजे ते कुणाच्या बाजूने आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितले. अलीकडच्या काळात अमेरिकेतील अनेक खासदारांनी यूक्रेन परिस्थितीत भारताच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. त्यात खासदार जॉन कॉर्निन आणि भारतीय अमेरिकन काँग्रेसचे डॉ. अमी बेरा यांचाही समावेश आहे.