ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. ४ - भारत आणि चीन दोन्ही देशांनी पस्परांच्या इच्छा, आकांक्षा आणि गरजांबद्दल संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या भेटीत व्यक्त केले. जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर रविवारी नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये चर्चा झाली.
भारत आणि चीन दोन्ही देशांनी परस्परांच्या इच्छांचा आदर केला पाहिजे असे पंतप्रधानांनी शी जिनपिंग यांना सांगितल्याचे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी या भेटीसंबंधी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्यांवर विसंवाद वाढत चालला आहे.
भारत-चीन भागीदारी फक्त दोन देशांसाठी नव्हे तर, आशिया खंड आणि संपूर्ण जगासाठी महत्वाची आहे असे मोदींनी जिनपिंग यांना सांगितले. जिनपिंग यांनी सुद्धा मोदींच्या मताला दुजोरा देताना परस्परांचा आदर करणे दोन्ही देशांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
वादग्रस्त मुद्यांवर सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी यावेळी पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालण्याचा मुद्दा उपस्थित केला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनने वेगवेगळया व्यासपीठांवर भारताला रोखण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. चीनने यापूर्वी भारताचा एनएसजी सदस्यत्वाचा मार्ग रोखला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रातील मसूद अझरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताचा प्रस्तावाला पाठिंबा द्यायला नकार दिला. मसूद अझर पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे.