जेरुसलेम- एअर इंडियाच्या इस्रायलला जाणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून उडण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त इस्रायलमधील दैनिक हारेट्झने प्रसिद्ध केले आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सौदी अरेबियाच्या नागरी उड्डाण विभागाने स्पष्ट केल्याचेही वृत्त इतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. एअर इंडिया किंवा भारताचा नागरी उड्डाण विभाग यांच्यापैकीच याबाबत योग्य माहिती स्पष्ट करु शकतील.
अनेक अरब देश आणि इस्लामिक देशांनी अजूनही इस्रायलला मान्यता दिलेली नाही त्यामुळे त्यांनी आपल्या हवाई ह्ददीमधून इस्रायलच्या विमानांना उडण्यासाठी या देशांनी परवानगी नाकारली आहे. एअर इंडियाच्या अहमदाबाद, मस्कत, सौदी अरेबिया आणि तेल अविव अशा मार्गावरील उ्डडाणास सौदी अरेबिया परवानगी देईल अशी माहिती एका अधिकाऱ्याने यासंदर्भात बोलताना दिली आहे. यामुळे इस्रायलचा प्रवास अडिच तासांनी कमी होणार असून इंधनखर्चातही घट होणार आहे.सध्या इस्रायलची विमान कंपनी एल-आल तेल अविव आणि मुंबईमध्ये विमानसेवा देते. पण हा प्रवास तांबडा समुद्र, एडनचे आखात असा करावा लागतो. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान हा मार्ग जवळचा असूनही तो या हवाई प्रवासासाठी वापरता येत नाही. त्यामुळे मुंबई आणि तेल अविव या प्रवासासाठी सात तासांचा अवधी लागतो. इस्रायलच्या पर्यटन विभागाने एअर इंडियाच्या इस्रायल हवाई उड्डाणांसाठी ७ लाख ५० हजार युरोंचा निधी जाहीर केला आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यामुळे भारत-इस्रायल प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी काही फायदा होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.