Narendra Modi Singapor Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी गुरुवारी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि सिंगापूरमधील धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला. भारत-पॅसिफिक क्षेत्रातील हा दुसरा देश आहे, ज्यासोबत भारताने आपल्या संबंध मजबूत केले आहेत. यापूर्वी भारत आणि मलेशिया यांच्यात 20 ऑगस्ट 2024 रोजी असाच करार झाला होता.
भारतात अनेक सिंगापूर उभारले जातीलदोन्ही नेत्यांमध्ये यावेळी महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी झाली. यामध्ये सेमीकंडक्टरचे उत्पादन वाढवणे, आरोग्य क्षेत्र, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रात गरजेनुसार युवा कामगारांना प्रशिक्षण देणे, यासह डिजिटल क्षेत्रासंबंधी चार करार करण्यात आले आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, वोंग यांच्या नेतृत्वाखाली सिंगापूर अधिक वेगाने प्रगती करतोय. सिंगापूर हा केवळ भागीदार देश नाही. सिंगापूर हे प्रत्येक विकसनशील देशासाठी प्रेरणास्थान आहे. आम्हाला भारतात अनेक सिंगापूर निर्माण करायचे आहेत आणि या दिशेने आम्ही एकत्रित प्रयत्न करत आहोत याचा मला आनंद आहे.
दरम्यान, पीएम मोदींच्या दौऱ्यानंतर भारत आणि सिंगापूरने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात चीनची आक्रमक वृत्ती, दक्षिण चीन समुद्रातील सद्यस्थिती आणि या क्षेत्रातील सर्व देश आणि त्याच्याशी संबंधित नसलेल्या देशांकडे आचारसंहिता निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही आचारसंहिता आंतरराष्ट्रीय कायदा आणि समुद्रावरील युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन (UNCLOSE) अंतर्गत बनवण्यात यावी, जेणेकरून या प्रदेशात शांतता, स्थैर्य, सुरक्षा आणि स्वातंत्र्य सुनिश्चित होईल, असे म्हटले आहे. दोन्ही पक्षांनी कोणत्याही बळाचा वापर न करता शांततेने वाद मिटवण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका असल्याचे सांगून दोन्ही देशांनी ते कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू नये, असे म्हटले आहे. दहशतवादाविरोधात दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढवले जाईल. सिंगापूरमध्ये प्राचीन तमिळ भाषेतील कवी तिरुवल्लुवर केंद्र स्थापन करण्याची घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली. त्यांनी सिंगापूरचे वर्णन भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचे शिल्पकार म्हणून केले. 10 वर्षांच्या धोरणात्मक संबंधांमध्ये द्विपक्षीय व्यापार दुप्पट करणे आणि सिंगापूर ते भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण 150 अब्ज डॉलरपर्यंत तिप्पट झाल्याचे नमूद केले. यासोबतच त्यांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये संबंध सुधारल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
भविष्याचा रोडमॅप तयार भारत आणि सिंगापूर सरकारने प्रत्येकी चार कॅबिनेट मंत्र्यांचा एक विशेष गट स्थापन केला आहे जो द्विपक्षीय सहकार्यासाठी नवीन अजेंडा तयार करेल. त्याची दुसरी बैठक गेल्या आठवड्यात झाली. या गटाने चार क्षेत्रात सहकार्याचा आराखडा तयार केला असून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. पीएम मोदी आणि पीएम वाँग यांनी मजबूत संरक्षण संबंधांचा विस्तार करण्यास समर्थन दिले आहे.