तालिबानच्या येण्याने अफगाणिस्तानचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील अर्थव्यवस्था कोलमडली असून लोकांना घरातच रहावे लागत असल्याने घरातील अन्नधान्य संपले आहे. यामुळे या लोकांची उपासमार होत आहे. भारताने तालिबानी राजवट बाजुला ठेवून अफगाणी नागरिकांना अन्न धान्याची मदत देऊ केली आहे. परंतू, ती पोहोचविण्यासाठी पाकिस्तानच्या जमिनीची गरज आहे.
अफगाणिस्तानला अन्न-धान्य पोहोचविण्यासाठी भारताने पाकिस्तानकडे जमिन वापरण्यास देण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी भारत अफगाणिस्तानला गहू पोहोचविणार आहे. यासाठी पाकिस्तानने रस्ते मार्गे वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यावर शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने अफगाणिस्तानला आधीपासून खूप मदत केली आहे. तिथे डॅम बांधणे, वीज निर्मिती करणे आदी कामे केलेली आहेत. यामध्ये भारत 10 लाख मेट्रिक टन गहू देण्याचे देखील आहे. यातील 50 हजार मेट्रिक टन गहू पाठविला जाणार आहे. मात्र दोन्ही देशांना जोडणारा मार्ग हा पाकिस्तानातून जातो. अटारी-वाघा बॉर्डरवरून हा गहू अफगाणिस्तानला पोहोचवायचा आहे.
इम्रान खान यांच्या कार्यालयाने ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत भारत माणुसकीच्या नात्यातून अफगाणिस्तानला गहू पाठविणार आहे. अफगाणिस्तानच्या बंधूंसाठी पाकिस्तानची जमीन वापरण्यास देण्याचा विचार केला जाईल, असे म्हटले आहे.