नवी दिल्ली – जगातील सर्वात ताकदवान १५ सदस्य असलेली संस्था संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताला संधी मिळाली आहे. फ्रान्सकडून भारताला पुढील कार्यभार सोपवण्यात आला आहे. भारतासोबत समुद्री सुरक्षा, दहशतवाद तसेच अन्य मुद्द्यांवर काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं फ्रान्सचे राजदूत इमैनुएल लेनैन यांनी विधान केले आहे. भारताच्या या कतृत्वामुळं चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की, भारत(India) त्यांच्या कारकिर्दीत निष्पक्ष काम करेल. या कार्यकाळात भारत संबंधित नियम आणि मानकांचे पालन करेल असं प्रवक्ते जाहिद हाफीज चौधरी यांनी सांगितले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत अस्थायी सदस्य आहे आणि त्याचा २ वर्षाचा कालावधी आहे. भारताने रविवारी १५ सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेतला. भारताचा हा कार्यकाळ पुढील १ महिना चालेल. भारत १ जानेवारी २०२१ रोजी सुरक्षा परिषदेचा सदस्य बनला होता. या काळात भारताला दोनदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
१ महिना काश्मीर मुद्द्यावर कुठलीही चर्चा पाक करू शकत नाही
पाकिस्तानी(Pakistan) प्रवक्ते म्हणाले की, भारताने अध्यक्षपदाचा कार्यभार घेतला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या जम्मू काश्मीर प्रस्ताव लागू करावा अशी आम्ही भारताला पुन्हा एकदा आठवण देऊ इच्छितो. अफगाणिस्तानात पाकिस्तानी समर्थक तालिबानी हिंसाचार घडवत आहेत. अफगाणिस्तान सैन्यासोबत त्यांचे युद्ध सुरू आहे. अशावेळी भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळालं आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताचं असणं म्हणजे पुढील १ महिना पाकिस्तान काश्मीर मुद्द्यावर कुठलीही चर्चा सुरक्षा परिषदेत करू शकत नाही. त्यामुळे भारताला अध्यक्षपद मिळणं हे पाकिस्तानला अडचणीत टाकणारं आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणं याला पाकिस्तानचा विरोध आहे. इतकचं नाही तर पुढच्या एक महिन्यात अफगाणिस्तानातून विदेशी सैन्य पुन्हा परत जातंय त्यामुळे अफगाणिस्तानबाबत काही मोठ्या हालचाली होऊ शकतात.
पाकिस्तान, तालिबान आणि चीन(China) यांच्या नापाक षडयंत्राला भारत सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून मात देऊ शकतो. पाकिस्तान नेहमीच भारताच्या अफगाणिस्तानमध्ये उपस्थितीला विरोध करतंय. भारत पुढील एक महिन्याच्या कार्यकाळाचा प्रोग्राम ऑफ वर्क बनवतंय. त्यात चीन आणि पाकिस्तानच्या कृत्यांचाही समावेश आहे. भारत दहशतवादविरोधी अभियान आणि सागरी सुरक्षा यावर चर्चा करणार आहे. त्यात प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तान भारताच्या निशाण्यावर असतील हे निश्चित आहे.