नवी दिल्ली : भारत पायाभूत सुविधा, वाहतूक, कृषी, महामार्ग आणि अन्न प्रक्रिया उद्योगांत गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण$संधी उपलब्ध करून देत आहे, असे केंद्रीय रस्ते व महामार्ग, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ते शनिवारी येथे जागतिक फूड इंडिया, २०१७ कॉन्फरन्सने पायाभूत तंत्रज्ञान आणि उपकरणे यावर आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते.भारत दोन वर्षांत महामार्गांसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधाच देणार नाही, तर जलमार्ग आणि कृषी क्षेत्रातही मोठे बदल घडविणार आहे. ३२५ पाटबंधारे प्रकल्प, मोठा नदी जोड प्रकल्पाचा त्यात समावेश आहे. गडकरी म्हणाले, एकूण ३२ लॉजिस्टिक पार्कस्पैकी २४ नॅशनल कॉरिडॉर्स दोन लाख कोटी रुपये खर्चून बांधले जातील. चेन्नई, बंगळुरू, विजयवाडा, हैदराबाद, सूरत आणि गुवाहाटीत याचे काम सुरूही झाले आहे. या पार्कस्ची रचना शीतगृहे व गोदामांची गरज भागविणारी आहे. सरकारने घेतलेला दुसरा महत्त्वाचा पुढाकार म्हणजे सागरमाला प्रकल्प. बंदराद्वारे देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प आहे. यामुळे देशाचे सुमारे ४० हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. सागरमालातून १४ किनारी आर्थिक विकास विभागांचा आणि दोन मोठ्या अन्नप्रक्रिया पार्कस्चा विकास होईल. देशात फळे व भाजीपाल्यांची १३,३०० कोटी रुपयांची हानी होते. ते टाळण्यासाठी लॉजिस्टिक पार्कस्चा विकास हा आवश्यक बनला आहे, यावर गडकरी यांनी भर दिला. ही हानी एकूण उत्पादनाच्या ३५ टक्के आहे व केवळ पायाभूत सुविधा नसल्यामुळे ते सोसावे लागते, असे गडकरी यांनी सांगितले. भारतात दहा टक्के फळे आणि भाजीपाल्यांवर प्रक्रिया होते व हे प्रमाण जागतिक पातळीवरील टक्केवारीचा विचार करता केवळ १टक्का आहे, असेही ते म्हणाले.२०१९ पर्यंत २० टक्के फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई-कोलकाता आणि मुंबई-कन्याकुमारीसह ४४ इकॉनॉमिक कॉरिडॉर्सची बांधणी झाल्यावर, बाजारात उत्पादने लगेचच पोहोचतील. त्यांच्या साठवणुकीचा खर्च वाचून शेतकºयांच्या उत्पन्नात भर पडेल, असे नितीन गडकरी म्हणाले.
भारतात पायाभूत सुविधा, वाहतूक क्षेत्रांत जागतिक गुंतवणूकदारांना मोठी संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:32 AM