लंडन : कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांपासून मोठ-मोठे लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. इंग्लंडमधील परिस्थिती तर अधिकच बिघडायला सुरुवात झाली आहे. खुद्द पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयात आहेत. तर प्रिन्स चार्ल्सदेखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र, असे असतानाही ही मुळची भारतीय असलेली कन्या कोरोनाचा सामना करण्यासाठी रणांगणात उतरली आहे. त्या कन्येचे नाव आहे 'मिस इंग्लंड भाषा मुखर्जी'.
2019मध्ये मिस इंग्लंडचा मुकुट जिकणारी भाषा ही पेशाने श्वसना संबंधीच्या विकारांची डॉक्टरदेखील आहे. आता तीने आपला मिस इंग्लंडचा मुकुट काढून कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर म्हणून जबाबदारी हाती घेतली आहे. यासाठी तिने पूर्वी काम करत असलेल्या रुग्णालयात फोन करून, आपण परत डॉक्टरम्हणून काम करू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली. आपल्या डॉक्टरी पेशाला ब्रेक दिल्यानंतर भाषा मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली होती.
डिसेंबर 2019मध्ये झाली होती मिस इंग्लंड -
मिस इंग्लंड किताब जिंकल्यानंतर भाषा मुखर्जीला अनेक देशांत चॅरिटीसाठी आमंत्रण दिले गेले. याच संदर्भात ती गेल्या महिन्यातच भारतातही आली होती. 24 वर्षीय भाषाने आपल्या भारत दौऱ्यात अनेक शाळांना भेटीही दिल्या होत्या. यावेळी तिने मुलांना पुस्तकांसह शालेय साहित्याचे वाटपही केले. याशिवाय ती आफ्रिका आमि पाकिस्तानातही गेली होती. 9 वर्षांची असतानाच आली होती इंग्लंडला -
भाषा 9 वर्षांची असतानाच इंग्लंडला आली होती. येथेच तिने आपले शिक्षण पूर्ण केले. जगातील वेगवेगळे देश फिरत असलेल्या भाषाला तिच्या डॉक्टर मित्रांकडून तेथील परिस्थिती सातत्याने समजत होती. यानंतर तिने इंग्लंडमध्ये अक्राळविक्राळ रूप धारण करत असलेल्या कोरोना महामारीचा विचार करत पुन्हा आपल्या डॉक्टरी पेशाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
भाषाला पाचही 'भाषा' उत्तम प्रकारे बोलता येतात -
भाषाने नॉटिंघम यूनिव्हर्सिटीतून मेडिकल सायंसबरोबरच मेडिसिन आणि सर्जरीमध्येही पदवी मिळवली आहे. एवढेच नाही, तर तीला हिन्दी, इंग्रजी, बांग्ला, जर्मन आणि फ्रेन्च या पाचही भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात.