वॉशिंग्टन : पाकिस्तानकडून होणाऱ्या खऱ्याखुऱ्या किंवा अप्रत्यक्ष चिथावणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत पूर्वीच्या तुलनेत लष्करी शक्तीने उत्तर देऊ शकतो, असे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी काँग्रेसला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय गुप्तचर संचालनालय कार्यालयाने (ओडीएनआय) अमेरिकन काँग्रेसला सादर केलेल्या आपल्या वार्षिक ‘ॲन्युअल थ्रेट असेसमेंट’ अहवालात म्हटले आहे की, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामान्य युद्ध शक्य नाही, तरी दोन्ही देशांतील तणाव हा अधिक तीव्र होण्याच्या जोखमीची शक्यता आहे.’ ‘पाकिस्तानकडून असलेल्या अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष चिथावणीखोर वर्तनाला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत हा पूर्वीच्या भारताच्या तुलनेत लष्करी शक्तीने तोंड देण्याची शक्यता आहे आणि वाढलेल्या तणावामुळे अण्वस्त्रधारी उभय देशांत संघर्षाची जोखीम वाढली आहे. काश्मीरमधील हिंसक अशांतता किंवा भारतातील अतिरेकी हल्ल्यांमुळे संघर्षाची शक्यता वाढली आहे,’ असे अहवालात म्हटले आहे. ओडीएनआयच्या अहवालानुसार अफगाणिस्तान, इराक आणि सिरियातील संघर्ष हा अमेरिकेच्या सशस्त्र दलांवर थेट परिणाम करणारा आहे, तर अण्वस्त्रधारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची काळजी संपूर्ण जगाला आहे, असे अहवालात म्हटले आहे.
काश्मिरचा विशेष दर्जा रद्द केल्याने बिघडले संबंध - भारताने ५ ऑगस्ट, २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरचा घटनेतील विशेष दर्जा रद्द करून त्याचे रूपांतर दोन केंद्रशासित प्रदेशांत केल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध खूपच बिघडले व तेव्हापासून दोन्ही देशांच्या राजधानीत एकमेकांचे उच्चायुक्त नाहीत. - दहशतवाद, हिंसाचार आणि शत्रूत्वमुक्त वातावरणात शेजारी पाकिस्तानसोबत सामान्य संबंध असावेत, अशी आमची इच्छा असून, दहशतवाद आणि शत्रूत्वमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे, असे भारताने म्हटले आहे.