"भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध", इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 11:54 AM2024-09-08T11:54:03+5:302024-09-08T12:26:44+5:30

Italian PM Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले आहे.

India Can Help Resolve Russia-Ukraine Conflict: Italian PM Giorgia Meloni | "भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध", इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य

"भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध", इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य

लंडन : गेल्या महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरु आहे. युद्धादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी जॉर्जिया मेलोनी यांनी भारताच्या भूमिकेवर जोर दिला आहे. शनिवारी एका वक्तव्यादरम्यान त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत आणि चीनच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सांगितले. 

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी भारत आणि चीन भूमिका बजावू शकतात, असे जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी सांगितले. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर एका परिषदेच्यावेळी जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, "संघर्षाच्या निराकरणात चीन आणि भारताची भूमिका असली पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. तसेच, युक्रेनला एकटे टाकून हा संघर्ष सोडवला जाऊ शकतो, असा विचार करणेच शक्य नाही.'' 

दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे गुरुवारी मोठे वक्तव्य समोर आले होते. रशियाच्या युक्रेनसोबतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात. युक्रेन संघर्ष आणि समस्या सोडवण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले होते. अशातच आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.

भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे हे वक्तव्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन आणि रशिया दौऱ्यानंतर आले आहे. नरेंद्र मोदींच्या युक्रेन आणि रशिया दौऱ्यांची बरीच चर्चा झाली होती. नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. जगभरात या भेटीची चर्चा झाली. नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांना भेटी देऊन आपल्या भूमिकेवर ठाम राहून शांततेने चर्चा करुन मार्ग काढावा असे म्हटले होते. दरम्यान, हे युद्ध थांबवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनसह जगातील अनेक देशांनी म्हटले आहे. आता रशियाही तेच सांगत आहे. 

Web Title: India Can Help Resolve Russia-Ukraine Conflict: Italian PM Giorgia Meloni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.