संयुक्त राष्ट्रे- अमेरिकेची राजदूत निक्की हेली यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणा-या समर्थनाच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी भारत अमेरिकेची मदत करणार आहे. अफगाणिस्तान व दक्षिण आशियातल्या दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी ट्रम्प यांनी घोषित केलेली रणनीतीचा उल्लेख करतहेली म्हणाल्या, या रणनीतीच्या माध्यमातून भारतासोबत अमेरिकेची धोरणात्मक भागीदारी विकसित होणार आहे. आमच्यासाठी धोका असलेल्या अफगाणिस्तान व दक्षिण आशियातील दहशतवादी संघटनांना नेस्तनाबूत करणं आमच्या हिताचं आहे. तसेच आण्विक शस्त्रास्त्रांना दहशतवाद्यांपासून दूर ठेवायचं आहे. त्यासाठी आम्ही आमच्या राष्ट्रीय, ऊर्जा, अर्थव्यवस्था, कूटनीती व सेना या सर्व आयुधांचा वापर करू.अमेरिका-भारत मैत्री परिषदेत आयोजित एका कार्यक्रमात हेली म्हणाल्या, ट्रम्प यांनी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांनी मिळणा-या समर्थनावर कडक भूमिका घेतली आहे. अमेरिका, अफगाणिस्तानमध्ये जास्त करून आर्थिक व विकासाच्या क्षेत्रातील मदतीसाठी भारताकडे आशेनं पाहिलं जातंय. अफगाणिस्तानला खरंच भारताच्या मदतीची गरज आहे. ते दोन्ही देश त्या क्षेत्रात चांगले शेजारी व भागीदार आहेत, असंही हेली म्हणाल्या आहेत.भारत अफगाणिस्तानमध्ये लष्कराची तुकडी पाठवणार नाही, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारतानं अफगाणिस्तानाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत, गरज पडल्यास त्याचं आम्ही सविस्तर विश्लेषण करू. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेच्या समोरच भारत अफगाणिस्तानात सैन्य पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्लीच अफगाणिस्तानच्या नव्या रणनीतीची घोषणा केली आहे. या रणनीतीत भारत सर्वाधिक सक्रिय भूमिका निभावेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारत अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. गेल्या 16 वर्षांपासून संघर्षग्रस्त अफगाणिस्तानात भारतीय लष्करानं दखल दिली नव्हती. अमेरिकेच्या अफगाणिस्तान रणनीतीत पाकिस्तानची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.
निर्मला सीतारामन आणि जेम्स मॅटिस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पाकिस्तानच्या मुद्द्यावरही छेडले असता, पाकिस्तानचा मुद्दा भारतानं अमेरिकेसमोर उपस्थित केल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणा-या शक्तींना नेस्तनाबूत करू, असंही या संयुक्त पत्रकार परिषदेत विधान जारी करण्यात आलं होतं. जेम्स मॅटिस म्हणाले, दहशतवाद्यांना सुरक्षितरीत्या आश्रय देणा-यांना सहन केलं जाणार नाही. भारत आणि अमेरिका दहशतवाद संपवण्यासाठी संयुक्तरीत्या काम करेल.