India Canada Conflict : कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावरील हल्ल्याबाबत भारताने कठोर भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जस्टिन ट्रुडो सरकारला भारतीयांना धमकावू नका, असा स्पष्ट इशारा दिला आहे. आमच्या उच्चायुक्तांना आमच्या लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखू नका, त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका, असे भारताने स्पष्टपणे सांगितले आहे. शिवाय, प्रार्थनास्थळांवर होणारे हल्ले त्वरित थांबवावे आणि दोषी खलिस्तानींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही केली आहे.
दरम्यान, मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी आता मोठा खुलासा समोर झाला आहे. हिंदू फेडरेशन ऑफ कॅनडाने 30 ऑक्टोबर रोजीच स्थानिक पोलिसांना तक्रार पत्र सादर केल्याचे पत्र जारी केले. तसेच, दिवाळी सणानिमित्त 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत मंदिरांसाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी हे केले नाही, त्यामुळे हल्ले झाले. मात्र, त्याचवेळी व्हँकुव्हरमधील गुरुद्वाराच्या दिशेने बफर झोन तयार करण्यात आला होता. तसेच, तिथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे या हल्ल्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होतोय.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, काल ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरात अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. कॅनडा सरकारने अशाप्रकारचे हल्ले रोखले पाहिजेत. हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, अशी आशा आहे. कॅनडामधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत आम्ही अत्यंत चिंतित आहोत.
हिंसाचारात पोलिसांचा सहभाग?हल्ल्यात पील पोलीस सार्जंट हरिंदर सोही याचाही सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर दावा केला जात आहे की, तो ऑफ ड्युटी खलिस्तानी झेंडा असलेल्या गर्दीत होता. त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.