भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला आहे. त्यामुळेच राजकीय लढ्यानंतर आता आर्थिक लढा सुरू झाला आहे. प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिकच गुंतागुंतीचा होत आहे. याचा परिणाम उद्योगापासून शिक्षण क्षेत्रापर्यंत, अनेक गोष्टींवर पडू शकतो. याच दरम्यान आता भारताने आणखी एक कठोर पाऊल उचललं आहे. भारताने कॅनडासाठी व्हिसा सेवा स्थगित केली आहे. कॅनडातून भारतात येणाऱ्या कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे.
बीएलएस इंटरनॅशनल वेबसाइटच्या हवाल्याने ही बातमी समोर येत आहे. याबाबतची सूचनाही वेबसाईटवर देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून कॅनडाहून भारतात येणाऱ्यांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कॅनडाचा व्हिसा घेऊन भारतात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे. नोटीसमध्ये "भारतीय मिशनकडून महत्त्वाची माहिती - ऑपरेशनल कारणांमुळे, 21 सप्टेंबर 2023 (गुरुवार) पासून, पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय व्हिसा सेवा बंद करण्यात आल्या आहेत" असं म्हटलं आहे.
गेल्या तीन दिवसांत भारताने कॅनडावर कडक कारवाई करण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रु्डो यांनी केला. तसेच भारतीय राजदूताला कॅनडातून निघून जाण्याचा आदेश दिला. ट्रुडो यांनी केलेला आरोप भारताने फेटाळला, तसेच कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांचीही भारतातून हकालपट्टी करण्यात आली.
कॅनडातील काही भागांमध्ये भारतविरोधी कारवाया सुरू आहेत. ते लक्षात घेऊन भारतीयांनीकॅनडामध्ये प्रवास करताना सावधानता बाळगावी, त्या देशात शिकायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनीही सतर्क राहावे, अशा सूचना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना दिल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतविरोधी कारवायांना विरोध करणाऱ्या लोकांवर कॅनडामध्ये हल्ले होण्याचे प्रकार काही भागांत घडले आहेत. त्यामुळे त्या परिसरात प्रवास करणे भारतीयांनी टाळावे.