India Canada Crisis:भारत आणि कॅनडामध्ये निर्माण झालेल्या वादामुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती बिघडल्याचे दिसून येत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भारताने ट्रूडो यांचा दावा फेटाळून लावत आक्रमक भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारत आक्रमक भूमिका मांडत आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो नरमले असल्याचे बोलले जात आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. आता भारताने ट्रूडो सरकारला भारतातील आपल्या अधिकाऱ्यांना (डिप्लोमॅट) परत बोलावण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. कॅनडाने १० ऑक्टोबरपर्यंत भारतातून ४१ अधिकाऱ्यांना परत बोलावावे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
आम्हाला संबंध चांगले ठेवायचेत
कॅनडाला भारतासोबतचा तणाव वाढवायचा नाही. कॅनडाला भारतासोबत चांगले ठेवायचे आहेत. कॅनडा जबाबदारीने आणि रचनात्मक संबंध कायम ठेवेल, असा असे जस्टिन ट्रुडो यांनी म्हटल्याचे वृत्त देण्यात आले आहे. दुसरीकडे, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या भारतात कॅनडाचे ६२ डिप्लोमॅट आहेत. मोदी सरकारने ही संख्या २१ वर आणण्यास सांगितले आहे. म्हणजेच भारत सरकारने कॅनडाला १० ऑक्टोबरपर्यंत आपल्या ४१ अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. १० ऑक्टोबरनंतरही हे अधिकारी भारतातच राहिले, तर त्यांचे अधिकार काढून घेतले जातील, असे भारताने बजावले आहे.
दरम्यान, कॅनडाचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. पण भारताने कॅनडाला संख्येबाबत आधीच सांगितले होते की, दोन्ही देशांतील मुत्सद्दींची उपस्थिती समान असावी. २१ सप्टेंबर रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, भारतात कॅनडाच्या अधिकाऱ्यांची संख्या, कॅनडातील भारतीय अधिकाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ती कमी करण्याची गरज आहे.