India-Canada Relations: खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या कॅनडात झालेल्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद वाढला आहे. कॅनडाच्या कारवाईनंतर कॅनाडाच्या या कृत्याचे भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले. यानंतर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी (19 सप्टेंबर) यावर प्रतिक्रिया दिली. आम्ही भारताला भडकावण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु भारताने हा मुद्दा योग्य प्रकारे हाताळावा, अशी आमची इच्छा आहे.
जस्टिन ट्रूडो काय म्हणाले?रॉयटर्सच्या वृत्तानुसार, प्रकरण वाढल्यानंतर ट्रूडो म्हणाले, "भारत सरकारने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आम्हीही तेच करत आहोत. आम्ही हे प्रकरण भडकावण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत."
जस्टिन ट्रूडो यांनी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा दावा केला आहे. आरोप करण्याबरोबरच कॅनडाने एका वरिष्ठ भारतीय डिप्लोमॅटची हकालपट्टी केली आहे. कॅनडाच्या कारवाईनंतर भारतानेही कारवाई करत कॅनडाच्या डिप्लोमॅटची हकालपट्टी केली.
भारताने काय म्हटले?परराष्ट्र मंत्रालयाने ट्रूडो आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, असे बिनबुडाचे आरोप म्हणजे खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेक्यांना कॅनडात अभय देणे आणि भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला धोका आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेत केलेल्या विधानांचे आम्ही खंडन करतो. कॅनडातील कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप मूर्खपणाचा आहे, असे प्रत्युत्तर भारताने दिले.
काय प्रकरण आहे?खलिस्तान टायगर फोर्स (KTF) प्रमुख हरदीप सिंग निज्जर (45) याची 18 जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. भारताने जुलै 2020 मध्ये कठोर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत कॅनडामध्ये राहणाऱ्या निज्जरला दहशतवादी म्हणून घोषित केले होते.