बीजिंग - गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आपल्याच देशात अडचणीत सापडलेले आहेत. त्यातच त्यांच्या सर्वोच्च पदाला आव्हान देण्याचे प्रयत्नही झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग हे भारताविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते आधी लडाख आणि आता तवांगमध्ये चीनने केलेला घुसखोरीचा प्रयत्न हा निश्चित हेतूने केलेला आहे. त्या माध्यमातून भारताला युद्धासाठी चिथावणी देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्याबरोबरच सीमाभागात चीन आपल्या लष्करी शक्तीमध्ये सातत्याने वाढ करत आहे. त्यामाध्यमातून भारतासोबत युद्धसदृष्य निर्माण करून देशातील जनतेचं लक्ष कोरोना आणि कमकुवत अर्थव्यवस्थेवरून राष्ट्रवादाकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठीच्या झीरो कोविड पॉलिसीमुळे चीनमध्ये जिनपिंग यांच्याविरोधात असंतोष वाढत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रातील कंपन्या बंद आहेत. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे जिनपिंग यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. तसेच वाढत्या विरोधामुळे त्यांना कोविडच्या प्रोटोकॉलमध्ये सवलत देणे भाग पडले आहे.
या यापरिस्थितीत लोकांमधील असंतोष कमी करण्यासाठी राष्ट्रवादाकडे लक्ष वेधण्याचा जिनपिंग यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत, ते म्हणजे तैवानवर हल्ला करणे किंवा भरताविरुद्ध युद्ध पुकारणे. यापैकी तैवानवर आक्रमण केल्यास त्याच्या बचावासाठी अमेरिका आणि जपान युद्धात उतरू शकतात. त्यामुळे चीनवर नामुष्की ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्यातरी तैवानवर हल्ला करणे जिनपिंग टाळतील.
अशा परिस्थितीत भारतावर हल्ला करण्याचा पर्याय जिनपिंग चाचपून पाहत आहेत. लडाखमध्ये सैनिकी कारवाया करून त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण केलेली आहे. चीनने भारतावर आक्रमण केल्यास अमेरिकेसह अन्य पाश्चात्य देश त्याचा निषेध करतील, मात्र युद्धात उतरणार नाहीत. त्यामुळेच चीन भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे.
आता लडाखनंतर भारताने अरुणाचल प्रदेशमधील तवांग भागात चीनने हल्ला करण्याचा प्रयत्न का केला असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामागे चीनचे दोन हेतू दिसत आहेत. एक म्हणजे भूतानला तीन बाजूंनी घेरणे आणि दुसरं म्हणजे भारताकडून अरुणाचल प्रदेश हिसकावणे जर तवांगवर कब्जा केला तर भूतानच्या पूर्व भागात घुसणे चीनला शक्य होईल. त्यानंतर मोठी कारवाई करून भूतान गिळंकृत करता येईल, असा चीनचा होरा आहे.
तसेच तवांगवर कब्जा केल्यास संपूर्ण अरुणाचल प्रदेश आपल्या कब्ज्यात घेता येईल. असे चीनला वाटते. हा भाग तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. १९६२ च्या युद्धात चीनने तवांगवर कब्जा केला होता. मात्र चिनी सैन्य नंतर माघारी फिरले होते. दरम्यान, गेल्या काही वर्षांत भारताने या भागात आपला पाया भक्कम केला आहे. त्यामुळे चीनचा हेतू साध्य झालेला नाही.