वॉश्गिंटन – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षानंतर त्याचे पडसाद जागतिक देशांवरही उमटत आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर अमेरिकेने चीनवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी या घटनेचा निषेध करत अमेरिकेने चीनला भारतीय सीमेवर तणाव निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पार्टीला धूर्त संबोधले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी चीन सरकारवर निशाणा साधत सांगितले की, चीनची कम्युनिस्ट पार्टी नाटोसारख्या संस्थेच्या माध्यमातून स्वतंत्र जगाला पुन्हा जुन्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अशाप्रकारचे नियम बनवून चीनला मदत करत आहेत. पीपुल्स लिबरेशन आर्मीने भारतासोबत सीमेवर तणाव वाढवला आहे. जो जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. चीन दक्षिण चीन समुद्रावर सैन्य वाढवत आहे, ते बेकायदेशीरपणे या क्षेत्रावर आपला दावा करत आहेत असं अमेरिकेने सांगितले.
तसेच चीन समुद्री वाहतुकीस धोका निर्माण करत आहे. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या झटापटीत शहीद झालेल्या भारतीय जवानांबद्दल अमेरिकेने दु:ख व्यक्त केले. पोम्पियो यांनी युरोप आणि चीनचं आव्हान या विषयावर एका व्हर्चुअल कार्यक्रमाला संबोधित करताना हे सांगितले. त्याचसोबत मागील काही वर्षापासून पाश्चिमात्य देशांना वाटत आहे की, चीनमधील कम्युनिस्ट पार्टी बदलू शकते. चीनी लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम आणि सुधार होऊ शकतो असं ते म्हणाले.
दरम्यान चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने या चांगल्या विचाराचा फायदा घेतला पाहिजे, जगाला दाखवून दिलं पाहिजे की, ते सहकार्याची भूमिका घेतात. चीनमधील माजी राजनेता डेंग शियाओपिंग म्हणायचे की, आपली ताकद लपवून ठेवा आणि योग्य वेळेची वाट पाहा, मी अनेकदा सांगितले की, हे काय चाललं आहे? हा खूप जटील प्रश्न आहे. ही कोणाची चूक नाही. मागील काही दशकं युरोपीय आणि अमेरिका कंपन्या चीनमध्ये मोठ्या अपेक्षेने गुंतवणूक करत आहेत असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पोम्पियो यांनी सांगितले. तसेच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने कोरोना व्हायरसबाबतही खोटी माहिती दिली. त्यामुळे जगभरात कोरोनाचा फैलाव झाला. हे लपवण्यासाठी डब्ल्यूएचओवर दबाव टाकला. ज्यामुळे लाखो लोकांचे जीव गेले आणि जागतिक अर्थव्यवस्थेला नुकसान पोहचलं याचा पुनरुच्चार अमेरिकेने केला.