लडाखच्या गलवान खोऱ्यात LACवर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य देखील तयार झाले आहेत. मात्र दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, असं चीनकडून सांगण्यात येत आहे. परंतु दूसरीकडे भारताला धमकी देण्याचा प्रयत्न देखील चीनकडून केला जात आहे.
चीन सरकारचे वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'मधून पुन्हा एकदा भारताला धमकी देण्यात आली आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत चीनची किती जीवितहानी झाली हे जाहीर केलं, तर भारत सरकारवरचा दबाव अजून वाढेल, अशी धमकी चीनने दिली आहे.
वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४३ सैनिकांचा खात्मा केला, अशी माहिती समोर आली होती. मात्र या संघर्षामध्येच २० पेक्षा कमी सैनिकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा देखील चीनकडून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे देशातील चीनविरोधी भावनेवर भारतानं नियंत्रण मिळवलं नाही आणि भारतानं पुन्हा कोणताही सीमा संघर्ष निर्माण केल्यास त्यांचा १९६२ पेक्षाही अधिक अपमान होईल, असा इशारा देखील ग्लोबल टाइम्समधून देण्यात आला आहे.
तत्पूर्वी, चीनेने याआधी देखील भारताला धमकी दिली होती. भारताचे सध्या चीनसोबत पाकिस्तान आणि नेपाळसोबतही वाद सुरु आहे. पाकिस्तान चीनचा विश्वासू सहकारी आहे. तसेच नेपाळसोबतही चीनचे चांगले संबंध आहे. त्यामुळे संघर्ष आणखी वाढल्यास भारताला आमच्यासह पाकिस्तान आणि नेपाळच्या सैन्यासोबत लढावं लागेल, अशी धमकी देखील चीनकडून देण्यात आली होती.
चीनने आता कुरापती केल्यास योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान सज्ज आहेत. सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तर भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा आपले सैन्य तैनात करण्याची शक्यता भारतीय लष्कराला आहे. भारत एलएसीवरील फायरिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यासंबंधी विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.