बीजिंग : भारताने चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातल्यामुळे चिडलेल्या चीनने भारताला याची मोठी आर्थिक व अन्य प्रकारची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. चीन सरकारच्या मालकीच्या ग्लोबल टाइम्समध्ये याबाबचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामध्ये चिनी गुंतवणूकदार तसेच व्यापारी भारताच्या या राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेल्या कृतीला चोख प्रत्युत्तर देतील, असे म्हटले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था सध्या कोरोनाचा फटका सहन करीत आहे. याच काळात चीनची अॅप बंद करण्याचा सरकारच्या निर्णयाने चीनमधील गुंतवणूकदार आणि व्यापारी यांना धक्का बसला आहे. त्यामुळे यापुढे भारतात गुंतवणूक करण्याबाबत त्यांच्याकडून विचार केला जाईल, असे या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. भारत आणि चीनदरम्यान सीमा वाद हा जुना आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही देशांमध्ये आता आर्थिक चढाओढही सुरू झाली आहे.
सन २०१७मध्ये झालेल्या डोकलाम संघर्षाच्या वेळी भारताला झालेले आर्थिक नुकसान मर्यादित होते. मात्र यावेळी भारताला मोठा आर्थिक फटका आम्ही देऊ शकतो, असे चिनी दैनिकाने म्हटले आहे. भारताला चीनबरोबर आर्थिक युद्ध परवडणारे नसल्याचेही या दैनिकाने म्हटले आहे.गुगल, अॅपलच्या अॅप्स स्टोअरमध्ये ब्लॉक
- सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअर यांनी भारतातील मोबाइल फोनमधून ही अॅप ब्लॉक केली आहेत.
- सरकारने बंदी घातलेली अॅप आमच्या भारतातील प्ले स्टोअरमध्ये तात्पुरती ब्लॉक करण्यात आल्याचे गुगलने सांगितले आहे. मात्र किती अॅप ब्लॉक केली याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. अॅपलच्या अॅप स्टोअर्सनेही असेच केले आहे.
- टिकटॉक अॅप हे पूर्णपणे बंद झाले असून, त्याचे भारतातील काम पूर्णपणे थांबले आहे. याशिवाय यूसी ब्राऊजर, शेअर ईट, वुई चॅट, कॅमस्कॅनर आणि एमआय कम्युनिटी ही अॅप प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आली आहे.
- बिगो लाइव्ह या बंदी घातलेल्या अॅपने आपण काही काळासाठी प्ले स्टोअरवरून आपले अॅप काढून घेतले असल्याचे जाहीर केले आहे.