भारत-चीनचे संबंध जटिल : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 10:28 AM2023-06-02T10:28:35+5:302023-06-02T10:29:07+5:30
अमेरिकेतील स्टॅनफाेर्ड विद्यापीठाच्या कार्यक्रमात व्यक्त केली चिंता
‘चीन भारतावर काहीही लादू शकत नाही, परंतु भारत-चीन संबंध सोपे राहिले नाहीत, ते दिवसेंदिवस जटिल होत चालले आहेत,’ अशी चिंता काँग्रेस नेते राहुल गांधी येथील एका कार्यक्रमात व्यक्त केली. अमेरिकेच्या तीन शहरांच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी बुधवारी सिलीकॉन व्हॅलीतील स्टार्टअप उद्योजकांशीही चर्चा केली.
राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चीन संबंधांविषयी चिंता व्यक्त केली. “आगामी काळात दोन्ही देशांतील संबंध अवघड आहेत. म्हणजे त्यांनी आमचा काही प्रदेश ताब्यात घेतला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अवघड आहेत, ते इतके सोपे नाहीत.”
रशियाविषयक धोरणाचे समर्थन
“आम्ही रशियावर काही बाबतीत अवलंबून आहोत. म्हणूनच भारत सरकारची जी भूमिका आहे, तीच माझी आहे. भारत हा एक मोठा देश आहे, त्याचे इतर देशांशी संबंध असणारच,” असे राहुल गांधी म्हणाले.
अपात्र ठरू, असे कधीच वाटले नाही
आपण राजकारणात प्रवेश केला तेव्हा लोकसभेतून अपात्र ठरवले जाईल असे कधीच वाटले नव्हते, परंतु अपात्रतेमुळे लोकांची सेवा करण्याची मोठी संधी मिळाली, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.