वुहान- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांची वुहान येथे भेट होत आहे. या परिषदेमध्ये दोन्ही नेते विविध विषयांवर चर्चा करत आहेत. मात्र या परिषदेचा भारताला व द्वीपक्षीय संबंधांना कितपत फायदा होईल याबाबत जाणकार शंका उपस्थित करत आहेत. चीनच्या वारंवार बदलल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे भारत अजूनही या चर्चा परिषदांच्या यशाबाबत साशंक आहे.नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांची ही भेट नेहमीच्या भेटींपेक्षा वेगळी असणार आहे. ज्याप्रमाणे जिनपिंग यांचे साबरमती नदीकाठी अहमदाबाद येथे स्वागत केले गेले काहीशा तशाच प्रकारे वुहानमध्ये इस्ट लेक च्या काठावर त्यांचे स्वागत होईल त्याचप्रमाणे दोन्ही नेते इस्ट लेकमध्ये बोटिंगचा आनंदही घेतील.
भारत आणि चीन यांचे राजनैतिक संबंधांना गेली सात दशकांचा इतिहास आहे. 1950 साली चीनबरोबर राजनैतिक पातळीवर समाजवादी गटाच्याबाहेरील संबंध प्रस्थापित करणारा भारत हा पहिला देश होता. 1988 साली चीन आणि भारतातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमिवर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी चीनला भेट दिली होती.1993 साली नरसिंह राव पंतप्रधानपदी असताना चीनला गेले होते. त्यांनी प्रत्यक्ष ताबारेषेजवळ दोन्ही देशांनी शांततेचे वातावरण कायम राहावे यासाठी चीनबरोबर करारावर स्वाक्षऱी केली. 2003 साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चीनला भेट दिली. यावेळेस सीमेचे आरेखन व इतर विषयांबाबत चर्चा करण्यात आली. एप्रिल 2005मध्ये चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ भारतामध्ये आले होते. तेव्हा शांततेसाठी सहकार्याचा करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला. 2006 साली हु जिंताओ भारतात आले तर 2008 साली भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी चीनला भेट देऊन काही प्रलंबित विषयांवर चर्चा केली. डिसेंबर 2010मध्ये चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ भारतात आले तेव्हा दोन्ही देशांचा व्यापार 2015 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सवर नेण्याचा करार करण्यात आला. 2012 साली हु जिंताओ ब्रिक्स परिषदेसाठी भारतात आले होते. 2014 साली शी. जिनपिंग भारतात आले होते तेव्हा विविध विषयांवर 16 करार करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली चीनला पहिल्यांदा भेट दिली होती. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली होती. 2016 साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चीनमध्ये बीजिंग सह गुआंगडोंगला भेट दिली आणि दोन्ही देशांच्या विविध विद्यापिठांचे कुलगुरु व उच्च शिक्षण संस्थांच्या प्रमुखांच्या परिषदेत सहभाग घेतला.2016 साली जिनपिंग गोव्यामध्ये ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहिले तर 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी झियामेन येथील ब्रिक्स परिषदेला व हँग्झोऊ येथील जी-20 परिषदेला उपस्थित राहिले. या दोन्ही नेत्यांची जून 2016 साली ताश्कंद व 2017 साली अस्ताना येथेही भेट झालेली आहे.