बिजींग, दि. 8 - कुठल्याही परिस्थितीत चीन युद्धाचे पाऊल उचणार नाही असा भारताचा विश्वास असेल तर, भारताचे विश्लेषण हे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि लष्करी विज्ञानाला धरुन नाही. नरेंद्र मोदी सरकारने चीनच्या इशा-याकडे दुर्लक्ष करु नये अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि युद्ध अटळ असेल अशी धमकी पुन्हा एकदा ग्लोबल टाइम्सच्या लेखातून देण्यात आली आहे. ग्लोबल टाइम्स हे चिनी सरकारच्या मालकीचे वृत्तपत्र असून त्यात जे छापून येते त्याकडे चीन सरकारची अधिकृत भूमिका म्हणून पाहिले जाते.
सिक्कीम सीमेजवळच्या डोकलाममध्ये संघर्ष निर्माण झाल्यापासून ग्लोबल टाइम्सच्या लेखातून अनेकदा भारताला युद्धाची धमकी देण्यात आली आहे. कालच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देऊन ग्लोबल टाइम्सने धमकीची भाषा केली आहे. चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही. छोटया मर्यादीत स्वरुपाचे युद्धाचे पाऊलही चीन उचलणार नाही असा भारतीय सुरक्षा यंत्रणांना विश्वास असल्याचे टाइम्सच्या वृत्तात म्हटले होते. आम्हाला सुद्धा युद्ध नकोय. सीमेवर शांतता हवी आहे. भारत आणि चीनची एकत्र वाटचाल हवी आहे. पण भारतीय सैनिक चीनच्या भूमिवरुन माघारी फिरले नाहीत तर, मात्र संघर्ष अटळ आहे असे लेखात म्हटले आहे.
1962 साली सुद्धा भारतीय सैन्य भारत-चीन सीमेवर चिथावणी देत होते. त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना सुद्धा चीन प्रत्युत्तर देणार नाही असे वाटले होते. चीन त्यावेळी अंतर्गत वाद आणि नैसर्गिक आपत्तीसा सामोरा गेला होता. चीनचा अमेरिकेबरोबर संघर्ष सुरु होता. पण या सर्व परिस्थितीतही चीनने आपल्या प्रादेशिक अखंडतेसाठी युद्धाचा पाऊल उचलले होते याची आठवण यानिमित्ताने करुन दिली आहे. काल चीनने पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या माध्यमातून भारताला इशारा दिला.
प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याचा आमचा जो संकल्प आहे त्याला भारताने कमी लेखू नये असे पीपल्स डेलीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. सिक्कीममध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याने भारत-चीन सीमारेषेचे उल्लंघन करुन चीनच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. भारताची ही कृती पूर्णपणे बेकायदा आहे असा आरोप करण्यात आला आहे. चीनचे कायदेशीर अधिकार आणि हित लक्षात घेऊन सर्व आवश्यक उपायोजना करु असे पीपल्ड डेलीच्या वृत्तात म्हटले आहे.