थिंपू : भारताची मैत्रिपूर्ण संबंधांशी बांधिलकी सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मजबूत आणि वैभवशाली’ भारतच प्रदेशातील छोट्या देशांना मदत करू शकेल, असा स्पष्ट संदेश दिला. मोदी यांनी आपल्या दोनदिवसीय दौऱ्याच्या समारोपावेळी यापूर्वीच्या सरकारांनी भूतानशी केलेल्या सर्व करारांच्या पूर्ततेची ग्वाही दिली.भूतानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला पंतप्रधान मोदी यांनी काल संबोधित केले. ते म्हणाले, सत्ता परिवर्तनामुळे दीर्घकाळापासूनच्या मैत्री संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. उभय देशांतील मैत्रीसंबंध हे ऐतिहासिक आणि दोहोंच्या हृदयाची दारे एकमेकांसाठी उघडी असल्याचे ते म्हणाले. भूतानच्या माजी राजाने ‘दूध आणि पाणी’ अशा शब्दांत उभय देशांतील मैत्री संबंधांच्या केलेल्या वर्णनास पंतप्रधानांनी यावेळी दुजोरा दिला.मोदी यांनी केवळ भारताच्या सक्षमतेकडे लक्ष वेधले नाही तर त्यांनी भूतानसह सार्क देशांचा विकास हा दक्षिण आशियाच्या भरभराटीसाठी पूरक असल्याचे नमूद केले. शेजारी देशांसोबत मजबूत मैत्री संबंध निर्माण करण्यास भारत नेहमीच प्रयत्नशील असेल. भारतच विविध समस्यांनी त्रस्त असेल, तर तो शेजाऱ्यांशी कशी मदत करू शकेल याकडे पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले. भारत आणि भूतान यांच्या भागीदारीतून उभारल्या जाणाऱ्या खोलोनग्याचु जलविद्युत प्रकल्पाचा पायाभरणी समांरभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडला. या प्रकल्पापासून ६०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल.एका संयुक्त निवेदनानुसार, उभय देशांमध्ये परस्पर सुरक्षेच्या मुद्यावर सामंजस्यातून तोडगा काढण्यावर सहमती झाली. राष्ट्रीय हिताच्या मुद्यावर समन्वय आणि सहकार्य कायम ठेवण्यावर तसेच परस्परांना धोकादायक ठरतील अशा कृत्यांसाठी आपल्या भूमीचा वापर करू न देण्यावर दोन्ही देशांत एकमत झाले. मुक्त व्यापार कराराच्या मुद्यावरही मोदी आणि भूतानचे पंतप्रधान तोबग्ये यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधानांसोबत या दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘अतिशय समाधानी’ व ‘अतिशय यशस्वी’ अशा शब्दांत या दौऱ्याचे यश नमूद केले. सवलतींची घोषणाभूतानशी मजबूत आणि व्यापक मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अनेक सवलतींची भारताने घोषणा केली. यात दूध पावडर, गहू, खाद्यतेल, डाळ आणि बासमती वगळता अन्य तांदूळ यांच्या निर्यातीवरील निर्बंधातून भूतानला मुक्त करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
सुदृढ शेजारधर्मास भारत बांधील
By admin | Published: June 16, 2014 11:46 PM