ऑनलाइन लोकमत
ब्रुसेल्स, दि. १४ - डोकलाममध्ये भारतीय लष्कराने चीनी सैन्याच्या आक्रमक हालचालींना पायबंद घातल्याने निर्माण झालेली तणावाची परिस्थिती अद्याप कायम आहे. नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका घेत भूतानच्या सीमेवरील डोकलाममध्ये रस्त्याचे बांधकाम सुरू केल्यावर भारताकडून फारसा विरोध होणार नाही, असे चीनला वाटत होते. मात्र सिक्कीमच्या सीमेवर भारत एवढा आक्रमक होईल याची कल्पना चीनला नव्हती. युरेपियन संसदेचे उपाध्यक्ष आरेसार्द चारनियेत्सकी यांनी आपल्या एका लेखात यासंदर्भातील उल्लेख केला आहे.
चारनियेत्सकी इपी टुडेसाठी लिहिलेल्या आपल्या लेखात म्हणतात, भारत भूतानच्या सीमेच्या संरक्षणासाठी एवढी आक्रमक भूमिका घेईल अशी चीनची अपेक्षा नव्हती. १६ जूनला डोकलाममधील डोकला येथून झोम्पेलरी येथील भूतानी लष्कराच्या छावणीपर्यंत चीनने रस्ता बांधण्यास सुरुवात केली. भूतान आणि चीनमध्ये सीमा विवादाबाबत चर्चा सुरू असतानाच चीनने हे आक्रमक पाऊल उचलले होते. मात्र भारताने हस्तक्षेप केल्याने चीनला रस्त्याचे काम पूर्ण करता आले नाही. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे.अधिक वाचा (बॉम्बर विमानाची सवय करुन घ्या! जपानला चीनचा इशारा )(चीनच्या धमकीला ठेंगा, भारतीय लष्कराने डोकालममध्ये गाडले तंबू )( चीनच्या धमक्या आणखी वाढल्या )
चीनचे परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार नसल्याचेही चारनियेत्सकी यांनी सांगितले. तसेच १६ जूनला डोकला येथे रस्ता बांधण्यासाठी केलेला प्रयत्न हासुद्धा चुकीच्या परराष्ट्र धोरणाचा भाग आहे, असेही. त्यांनी सांगितले. भूतातनने मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून चीनच्या घुसखोरीचा विरोध केला होता. भूतान अशाप्रकारे विरोध करेल हे चीनला अपेक्षित होते. पण भारत आपला शेजारील देश असलेल्या भूतानच्या मदतीसाठी आक्रमकपणे धावून येईल, असे चीनला वाटले नव्हते. भूतानचा विरोध मोडून काढत झोम्पेलरीमध्ये रस्ता बनवू अशी चीनची अपेक्षा होती. ज्याचा त्यांना रणनीतीकदृष्ट्या मोठा फायदा होणार होता. पण भारताच्या विरोधामुळे त्याला खिळ बसला आहे.