ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात आज झालेल्या भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये दहशतवादासह विविध मुद्द्यावर सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. दहशतवाद, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या मुद्यांवर दोन्ही देशांमध्ये जवळीक वाढत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीपेक्षा सध्या दोन्ही देश पाकिस्तानच्या मुद्यावर अधिक जवळ आल्याचे मानले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील बहुचर्चित भेटीपूर्वी काल अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याला जागतिक दहशतवादी घोषित करत अमेरिकेने याचे संकेत दिले आहेत.
दोन्ही नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त वक्तव्यामध्ये कट्टरपंखी इस्लामिक दहशतवाद संपवण्याचा निर्धार करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेवर आल्यापासून इस्लामिक दहशतवाद या शब्दाचा वारंवार उल्लेख करत आले आहेत. मात्र मोदींनी दहशतवादाचा संबंध कुठल्याही धर्माशी जोडणे टाळले आहे. दरम्यान, ट्रम्प आणि मोदी यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त वक्तव्यामध्ये दोन बाबी ठळकपणे जाणवल्या. त्यातील महत्वाची बाब म्हणजे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना सूचिबद्ध करण्यासाठी एक नवे तंत्र बनवण्यावर जोर देण्यात आला. "भारत आणि अमेरिका दहशत रूपी दानवाविरोधात उभे आहेत. आम्ही दोन्ही देश दहशतवादी संघटना आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी कटिबद्ध आहोत," असे ट्रम्प म्हणाले होते.
मोदी आणि ट्रम्प यांच्यात व्हाइट हाउसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवादाला लक्ष्य केले. संयुक्त निवेदनामध्ये इस्लामिक दहशतवाद हा लोकशाहीसाठी धोका असल्याचे सांगत त्यांनी त्याचा खात्मा करण्याचे आवाहन करण्यात आले.