नवी दिल्ली - कोरोना व्हायरस लशीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत कोरोनाव्हायरस लाशीचे तब्बल 160 कोटी डोसची बुकिंग केली आहे. जगभरात लशीच्या बुकिंगसंदर्भात ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अहवालाप्रमाणे भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत यूरोपियन यूनियनने 158 कोटी तर अमेरिकेने 100 कोटीहून अधिक कोरोना लशींचे बुकिंग केले आहे. या लशी ट्रायलमध्ये यशस्वी ठरल्या तर वापराची मंजुरी मिळताच लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.
भारताने तीन कंपन्यांशी केलाय करार - जगभरात ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाच्या लशीची मोठी मागणी आहे. अनेक देशांनी या लशीचे 150 कोटी डोस बुक केले आहेत. भारतात ऑक्सफर्डच्या लशीचे सीरम इंस्टिट्यूट आणि एस्ट्राजेनेकाकडून क्लिनिकल ट्रायल केले जात आहे. भारत आणि अमेरिकेने या लशीचे 50-50 कोटी डोस बुक केले आहेत. या शिवाय नोव्हावॅक्सच्या लशीचे 120 कोटी डोसदेखील बुक करण्यात आले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन नोव्हेंबर महिन्यात म्हणाले होते, भारत जुलै-ऑगस्ट 2021पर्यंत 50 कोटी डोज मिळविण्यासाठी लस निर्माता कंपन्यांच्या संपर्कात आहे. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, भारताने रशियन कोरोना लस Sputnik V च्या 10 कोटी तर नोवाव्हॅक्सच्या लशीच्या 100 कोटी डोससाठी डील केली आहे.
भारत रशीयन लशीचे उत्पानही करणार -भारत रशियन कोरोना लस स्पुतनिक Vचेही वर्षाला 100 मिलियन डोस तयार करणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि हैदराबादची कंपनी हेटेरो बॉयोफार्मा यांच्यात करार झाला आहे. आरडीआयएफने म्हटले आहे, की 2021च्या सुरुवातीला या लशीचे उत्पादन सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. ही लस मानवी परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर 91.4 टक्के प्रभावी ठरल्याचा दावा रशियन कोरोना लस स्पुतनिक V कडून करण्यात आला होता.