नवी दिल्ली- इंग्लंडमधील एका गटाने भारतामध्ये असंतोष पसरेल अशा प्रकारची कृती सुरु केली आहे. या गटाने इंग्लंडमध्ये खलिस्तानवर सार्वमत घेण्यासाठी प्रयत्न चालवले असून 'स्वतंत्र पंजाबसाठी' सार्वमतातून पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरु केली आहे.
सिख फॉर जस्टीस असे या गटाचे नाव असून 12 ऑगस्ट रोजी लंडनमधील ट्रफाल्गर स्क्वेअर येथे एक जागतिक रॅली आयोजित करण्यासाठी या गटाने हालचाली सुरु केल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ,'' याबाबत आपल्याकडे माहिती आली असून हे प्रकरण आम्ही इंग्लंड सरकारच्या समोर ठेवले असून आम्ही राजकीय पावलेही उचलणार आहोत'' अशी माहिती दिली आहे. द्वेष पसरवणाऱ्या अशा कोणत्याही गटाला परवानगी देऊन इंग्लंड सरकार द्वीपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ देणार नाही अशी आम्हाला आशा आहे अशा स्पष्ट शब्दांमध्ये रवीश कुमार यांनी बाजू मांडली आहे. इंग्लंड आणि इतर परदेशांमध्ये राहाणाऱ्या शीख लोकांपैकी बहुतांश शीख हे भारताच्या बाजूने विचार करणारे आहेत. मात्र काही लहानसे गट अशांतता पसरवण्याचे काम करत आहेत असेही रवीश कुमार यांनी सांगितले आहे.सिख फॉर जस्टीसच्या रॅलीमध्ये 2020 साली शीखांचे सार्वमत घेण्याबद्दल विचार होणार आहे. या सार्वमतामध्ये 3 कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असे सीख फॉर जस्टीसने जाहीर केले आहे. भारतातील शीखांनाही यामध्ये सहभाग घेता येईल असे या संघटनेने म्हटले आहे.80 च्या दशकातील खलिस्तानची चळवळ भारतातून नष्ट करण्यात आली असली तरी इंग्लंड, कॅनडासारख्या देशांमध्ये काही मोजक्या लोकांनी खलिस्तान प्रश्नाचा निखारा जपून कायम धगधगत ठेवला आहे. यामुळे भारत आणि कॅनडा यांच्या परस्परसंबंधांवर अनेकदा परिणाम झाला आहे.