इस्लामाबाद : सुरक्षा परिषदेच्या सुधारणेअंतर्गत भारताला कायम सदस्यत्व देणे आम्हाला मान्य नाही, आमच्यासाठी हा प्रस्ताव स्वीकारार्ह नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. भारताने संयुक्त राष्ट्राच्या काश्मीरवरील ठरावाचे पालन केले नाही, त्यामुळे भारताला सुरक्षा परिषदेची कायम सदस्यत्व देऊ नये, असे शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नवाज शरीफ यांना फोन केला व त्यांच्याशी दोन्ही राष्ट्रांमधील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली. अर्धा तास चाललेल्या या संवादात ओबामा यांनी दक्षिण अशियातील स्थैर्य व शांतता यावरही चर्चा केली. त्यावेळी नवाज शरीफ यांनी भारताला सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व देण्यास अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्राच्या काश्मीरवरील ठरावाबाबत भारत सहकार्य करीत नाही. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची भारताची तयारी नाही, असे शरीफ म्हणाले. (वृत्तसंस्था)