ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्र, दि. १४ - काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन संयुक्त राष्ट्रामध्ये भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला त्याच व्यासपीठावरुन भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तान एक देश म्हणून दहशतवादाचा धोरणासारखा वापर करत आहे तसेच दहशतवादाचा मानवी हक्क समर्थनासाठी वापर करत आहे असे स्पष्ट शब्दात भारताने पाकिस्तानला सुनावले.
संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारणसभेत मानवी हक्काच्या विषयावर बोलताना संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानने आधी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या प्रतिनिधी मालीहा लोधी यांनी दहशतवादी बुरहान वानीला काश्मीरी नेता ठरवले. त्याचा भारताने कठोर शब्दात समाचार घेतला.
संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाचा पाकिस्तानने गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाचा धोरणासारखा वापर केला आहे. दहशतवाद्यांचे गुणगान करताना पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राने ज्यांना अतिरेकी घोषित केले त्यांना आश्रय स्थान मिळवून दिले आणि आता आपण हे सर्व मानवी हक्कांच्या समर्थनासाठी करत असल्याचा आव आणत आहेत अशा शब्दात भारताने पाकिस्तानला उघडे पाडले.
पाकिस्तान तोच देश आहे ज्यांना आपल्या खराब ट्रॅक रेकॉर्डमुळे संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेचे सदस्यत्व मिळवता आले नाही अशा शब्दात भारताने पाकिस्तानची कानउघडणी केली.