वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संकटात सध्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे काहीही बरळू लागले आहेत. आता तर त्यांनी कोरोना व्हायरसपासून झालेल्या मृत्यूंचा खरा आकडा भारताने लपविल्याचा गंभीर आरोप केला आहे. ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन यांनी विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे.
दोन्ही नेत्यांच्या डिबेटवेळी ट्रम्प म्हणाले की, जर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन असते तर अमेरिकेत आज 20 लाख लोक मृत झाले असते. यावर बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर पलटवार केला. ट्रम्प यांच्याकडे आताही कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी कोणताही प्लॅन नाहीय, त्यांनी केवळ वाट पाहिली आहे. त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, ज्याचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. यावेळी ट्रम्प यांनी भारताला चीन आणि रशियाच्या पंक्तीत बसवत त्या देशांप्रमाणे भारतानेही कोरोना मृतांचा आकडा लपविल्याचा आरोप केला आहे.
बिडेन यांनी कोरोनावरून ट्रम्प यांना घेरताच ट्रम्प यांनी ती चीनची चूक असल्याचा कांगावा केला. ट्रम्प यांच्या या अजब उत्तरावरून बायडेन यांनी ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याचा आरोप केला. ट्रम्प हे ईस्टरपर्यंत कोरोना संपेल असा दावा करत होते. मास्कच्या दाव्यावरही ट्रम्प यांनी जेव्हा मला गरज भासते तेव्हा मी मास्क घालतो, असे उत्तर दिले. मी बायडेन यांच्यासारखे मास्क घालत नाही. जेव्हाही तुम्ही त्यांना पाहाल ते मास्क लावूनच फिरतात. ते 200 मीटर लांबून बोलतील परंतू ते देखील मास्क घालूनच असा आरोपही ट्रम्प यांनी केला. कोरोनामुळे आम्ही चीनसाठी दरवाजे बंद करावेत असे बायडेन यांना वाटत नव्हते. कारण ते त्यांना खूप भय़ानक वाटत होते. यावर बायडन य़ांनी सांगितले की, कोरोनामुळे लाखो लोक मारले गेले आहेत. आता जर अक्कलहुशारीने आणि वेगाने पाऊले उचलली गेली नाहीत तर आणखी लोक प्राण गमावतील.
महत्वाचे म्हणजे कोरोना व्हायरस जेव्हा जगभरात पसरू लागला होता तेव्हा ट्रम्प हे निवडणूक पूर्व प्रचारासाठी भारतात आले होते. अमेरिकेतील भारतीयांची मते मिळविण्यासाठी ट्रम्प यांचा हा दौरा होता. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारतात जेव्हा लॉकडाऊनची गरज होती तेव्हा ट्रम्प यांच्यासाठीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे आरोप होत आहेत. अशावेळी ट्रम्प यांनी भारतावरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.