नवी दिल्ली: अफगाणिस्तानवरतालिबाननं कब्जा केल्यानं लाखो लोकांवर संकट निर्माण झालं आहे. तालिबानी राजवट अनुभवलेल्या अनेकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारनं मिशन देवी शक्ती सुरू केलं आहे. भारतात येऊ इच्छिणाऱ्या अफगाणी नागरिकांनादेखील मदतीचा हात दिला जात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या एका चिमुरड्याला वाचवण्यासाठी भारतानं संपूर्ण प्रक्रिया बाजूला ठेवली. कोणतीही कागदपत्रं नसताना केवळ माणुसकीच्या भावनेतून भारतानं चिमुरड्याला मदतीचा हात दिला. त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचा नियमदेखील मोडण्यात आला.
आपल्या देशात काय चाललंय, लोकांवर किती मोठं संकट आहे याची पुसटशीही कल्पना ४ महिन्यांच्या इखनूर सिंहला नाही. आई-वडिलांनी त्याचा पासपोर्ट तयार केलेला नाही. मात्र तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करताच इखनूरच्या आई वडिलांनी भारतीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आमच्याकडे इखनूरचा पासपोर्ट नाही. पण सुरक्षेची खूप काळजी वाटते, अशा शब्दांत लहानग्याच्या आई वडिलांनी पोटच्या पोराबद्दल चिंता व्यक्त केली. मदतीसाठी पदर पसरला.
जीव महत्त्वाचा, भारतानं नियम मोडलाभारतीय अधिकाऱ्यांनी इखनूरच्या आई वडिलांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. कागदपत्रांची चिंता, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी असलेले नियम बाजूला ठेवण्यात आले. इखनूरला त्याच्या आई वडिलांसोबत विमानानं भारतात पाठवण्यात आलं. इखनूर आई वडिलांसोबत विमानात असताना कागदपत्रं तयार करण्यात आली. काबुलहून निघालेलं विमान जेव्हा हिंडन विमानतळावर उतरलं तेव्हा सगळी औपचारिकता पूर्ण झालेली होती. अफगाणिस्तानातील संकट लक्षात घेऊन हिंडन विमानतळावरच फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे.
भारतीय अधिकाऱ्यांचे मानले आभारइखनूरसाठी भारतीय अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता पाहून त्याचे वडील केरपाल सिंह भारावून गेले. गेल्या १० दिवसांत अफगाणिस्तानात पाहिलेली भयानक परिस्थिती आजही त्यांच्या डोळ्यांपुढून जात नाही. केरपाल यांच्या कुटुंबात ५ सदस्य आहेत. स्वत:सह पत्नी आणि दोन मुलांचा पासपोर्ट त्यांच्याकडे आहे. पण इखनूरचा पासपोर्ट नसल्यानं अफागाणिस्तान सोडणं अवघड होतं. मात्र भारतीय अधिकारी अगदी देवदूतासारखे त्यांच्या मदतीला धावले.