संयुक्त राष्ट्रे : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भाषण करताना दोन नकाशे दाखवले. एका नकाशावर भारताला ‘वरदान’ असे दर्शविले होते, तर दुसऱ्या नकाशावर इराणला ‘शाप’ असे दर्शविले होते.
‘वरदान’ (ब्लेसिंग) असा ठळक मथळा असलेल्या नकाशात इस्रायल आणि त्याचे अरब भागीदार देश भारतापर्यंतच्या प्रदेशाला हिंदी महासागर व भूमध्य सागरमार्गे आशिया व युरोपशी जोडलेले दाखवले होते. ‘शाप’ (कर्स) असे लिहिलेल्या नकाशावर इराणने हिंदी सागरापासून भूमध्य सागरापर्यंतच्या प्रदेशात निर्माण केलेली दहशतवादी कमान दाखविण्यात आली होती. या नकाशात पॅलेस्टिनचा वेस्ट बँक व गाझापट्टीचा भूभाग तसेच सिरियातील गोलन हाइट्स इस्रायलचा भाग असल्याचे दाखविण्यात आले होते.
जगाने इराणच्या दहशतवादी कारवायांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याचा तसेच इराणचे लांगूलचालन केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. ‘आमच्यावर हल्ला केला तर आम्हीही तुमच्यावर हल्ला करू. इराणमध्ये असे कोणतेही ठिकाण नाही, जिथपर्यंत इस्रायल पोहोचू शकत नाही’, असा इशाराही नेतान्याहू यांनी दिला.