कीव्ह : रशियाकडून भारताला स्वस्तात कच्चे तेल मिळत असल्याने युरोपीय देशांनी विरोध सुरु केला होता. युरोपीय देश स्वत: रशियाच्या तेलावर जगत आहेत, मौजमजा करत आहेत. असे असताना भारताला त्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. यावर भारतानेही त्यांना खडेबोल सुनावले आहेत. असे असताना आता युक्रेनने भारताला नैतिकतेचे धडे देण्याचा प्रयत्न केला आहे.
युक्रेनवर रशियाने हल्ला केल्याने अमेरिका आणि युरोपने निर्बंध लादले आहेत. अख्खा युरोप रशियन गॅस आणि कच्च्या तेलावर चालतो. आज युक्रेन युद्धाला ९-१० महिने पूर्ण होत आलेले आहेत. आजही युरोप रशियाचेच कच्चे तेल वापरतोय. परंतू, भारताला स्वस्तात तेल मिळतेय हे पाहून युरोपीय देशांच्या पोटात दुखू लागले होते. यावर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वीच सुनावले होते.
युक्रेनी सरकारने उघडपणे मोदी सरकारच्या रशियाकडून तेल खरेदी करण्याचा विरोध केला आहे. युक्रेनी परराष्ट्रमंत्री दमयत्रो कुलेबा यांनी रशियाकडून कच्चे तेल घेणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे, असे म्हटले आहे. युक्रेनी जनता दरदिवशी वेदना सहन करतेय म्हणून भारताला स्वस्तातील तेल खरेदी करण्याची संधी मिळाली आहे, असे ते म्हणाले.
युक्रेनी जनता रशियाचे हल्ले दर दिवशी झेलतेय, दर दिवशी मरतेय तेव्हा भारताला स्वस्तात तेल मिळू लागले आहे. जर आम्हाला होत असलेल्या त्रासामुळे तुम्ही फायद्यात येत असाल तर आमच्यासाठी तुमच्या आणखी अधिक मदतीची गरज असेल, असे कुलेबा यांनी एनडीटीव्हीला म्हटले.
भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी युरोपीय देशांना प्रत्युत्तर दिले होते. फेब्रुवारीपासून युरोपीय देशांनी रशियाकडून एवढे तेल खरेदी केलेय की त्यानंतर १० देशांनी मिळून देखील तेवढे खरेदी केले नसेल, असा पलटवार केला होता. यावर युक्रेनच्या मंत्र्यांचे वक्तव्य आले आहे.
भारताने युरोपीय देशही हेच करत आहेत, असे म्हणणे पुरेसे नाहीय. तेलाच्या आयातीला रशियन हल्ल्यांमुळे होणाऱ्या मानवीय उत्पिडनाच्या नजरेने पहावे लागेल. मोदी हे युद्ध संपविण्यासाठी महत्वाची भूमिका निभावू शकतात. ते त्यांच्या विचारांनी एक बदल घडवू शकतात, असेही ते म्हणाले.