वॉशिंग्टन: युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाविरोधात अमेरिकेनं अनेक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांनी रशियावर व्यापारी निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. त्यातच अमेरिकेनं रशियाकडून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू घेण्यासही नकार दिला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दरही वाढले आहेत. त्यातच निर्बंधांमुळे रशियाचं नुकसान होत आहे. त्यामुळे रशियानं भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याबद्दल आता अमेरिकेनं त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
रशियावर अमेरिकेनं निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून भारतानं तेल खरेदी केल्यास भारतावरही कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर अमेरिकेनं भूमिका स्पष्ट केली. रशिया-युक्रेन संकटात भारतानं रशियाकडून तेल खरेदी केल्यास ते अमेरिकेच्या निर्बंधांचं उल्लंघन मानण्यात येणार नाही, असं अमेरिकेनं म्हटलं.
भूमिका स्पष्ट करतानाच अमेरिकेनं भारताला एक सल्लादेखील दिला. आम्ही लादलेल्या निर्बंधांचं पालन करावं असा आमचा कोणत्याही देशाला संदेश आहे, असं व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साक्री म्हणाले. रशियानं भारताला स्वस्त दरात तेल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर अमेरिकेला काय वाटतं, असा प्रश्न पत्रकारांनी साक्री यांना विचारला.
'भारतानं रशियाकडून तेल खरेदी केल्यास त्यामुळे निर्बंधांचं उल्लंघन होईल असं मला वाटत नाही. मात्र या काळाशी संबंधित इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात तुम्ही कोणत्या बाजूनं होतात त्याचाही उल्लेख असेल. त्यावेळी लिहिल्या जाणाऱ्या इतिहासात तुम्हाला कोणत्या बाजूला उभं राहायचंय?', असा सवाल उपस्थित करत साक्री यांनी भारताबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.
भारताची भूमिका काय?भारतानं युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाचं समर्थन केलेलं नाही. कूटनीतीच्या माध्यमातून, चर्चेतून मतभेद संपवा, असं आवाहन भारतानं दोन्ही देशांना केलं आहे. संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधात प्रस्ताव आणला गेला. त्यावेळी भारतानं तटस्थ भूमिका घेतली. त्यावरून अमेरिका भारतावर नाराज आहे.