वॉशिंग्टन : चीननेभारत, जपानसह अनेक देशांना लक्ष्य करत हेरगिरी करणाऱ्या बलूनचा ताफाच चालवला, असा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. अमेरिकन सैन्याने संवेदनशील अमेरिकी संरक्षण तळांवर घिरट्या घालणारा चिनी बलून नष्ट केल्यानंतर काही दिवसांनी हे वृत्त धडकले आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी चिनी बलूनची माहिती भारतासह इतर मित्र देशांना दिली आहे. दक्षिण कॅरोलिनाच्या किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागरावर शनिवारी एका लढाऊ विमानाने हेरगिरी करणारा बलून नष्ट केला होता. अमेरिकेच्या उप परराष्ट्र सचिव वेंडी शर्मन यांनी सोमवारी येथील सुमारे ४० दूतावासांच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार चिनी बलूनने भारत, जपान, व्हिएतनाम, तैवान आणि फिलीपिन्ससह अनेक देशांमधील लष्करी मालमत्तेची माहिती गोळा केली आहे. हे वृत्त अनेक अनामिक संरक्षण आणि गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मुलाखतींवर आधारित आहे. त्यानुसार चीनच्या पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) वायुसेनेद्वारे चालवलेली ही पाळत ठेवणारे बलून पाच खंडांमध्ये आढळून आली आहेत.
चीनने नुकसान केल्यास सडेतोड उत्तर : बायडेन- हेरगिरी करणाऱ्या बलूनवरून चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चीनने अमेरिकेच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण केल्यास स्वसंरक्षणासाठी पावले उचलली जातील, सडेतोड उत्तर दिले जाईल, असा सज्जड दम दिला आहे.
- बायडेन मंगळवारी रात्री त्यांच्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषणात म्हणाले, “मी चीनसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे, ज्यामुळे अमेरिकन हितसंबंध वाढून जगाला फायदा होईल. परंतु, चीनने आमच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण केला तर आम्ही आमच्या देशाचे रक्षण करू.”