संयुक्त राष्ट्रे : सन २००५-०६ ते २०१५-१६ या दशकामध्ये भारताने दारिद्र्य निर्मूलनामध्ये जगात अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. या काळामध्ये भारतातील २७.३ कोटी व्यक्ती या दारिद्र्यरेषेच्या वर आल्या असून, ही संख्या जगामध्ये सर्वाधिक असल्याचे संयुक्त राष्टÑांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.संयुक्त राष्ट्र विकास परिषद आणि आॅक्सफर्ड गरिबी आणि मानवी विकास कार्यक्रम (ओपीएचआय) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे. यामध्ये ७५ देशांमधील गरिबीचा अभ्यास करण्यात आला. यापैकी ६५ देशांमधील गरिबांची संख्या कमी झाली असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले.भारत आणि निकारागुआ या २ देशांमधील अनुक्रमे दहा आणि साडेदहा वर्षांचा कालावधी विचारात घेतला गेला आहे. भारतामधील सर्वाधिक २७.३ कोटी व्यक्ती या दारिद्र्यरेषेच्या वर आलेल्या दिसून आल्या. ही आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या लोकसंख्याविषयक अहवालावर आधारित आहे.जगातील १०७ विकसनशील देशांमधील १.३ अब्ज व्यक्ती (२२ टक्के) अद्यापही दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दारिद्र्यरेषेखालील या व्यक्तींपैकी ६४४ दशलक्ष व्यक्ती १८ वर्षांखालील आहेत.
दारिद्र्य निर्मूलनामध्ये भारत जगात अव्वल; ६५ देशांमधील गरिबी घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 1:46 AM