India vs Maldieve: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. यातच आता भारताचा मित्रदेश असलेल्या इस्रायलने लक्षद्वीपच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक करत मालदीवला आरसा दाखवला आहे. तसेच, इस्रायलने लक्षद्वीपबद्दल एक मोठी घोषणाही केली आहे.
भारतातील इस्रायली दूतावासाने X हँडलवर लक्षद्वीपचे काही फोटो शेअर केले लिहिले की, 'डिसेलिनेशन प्रकल्प सुरू करण्याच्या भारत सरकारच्या विनंतीवरुन आम्ही गेल्या वर्षी लक्षद्वीपला गेलो होतो. उद्यापासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यास तयार आहोत. ज्यांनी अद्याप लक्षादवीपचे सौंदर्य पाहिले नाही, त्यांच्यासाठी हे फोटो आहेत. या बेटाचे सौंदर्य या फोटोंमधून पाहू शकता.'
डिसेलिनेशन तंत्रज्ञान काय आहे?लक्षद्वीप चारही बाजूने समुद्राने वेढलेले एक बेट आहे. त्यामुळे इथे ताज्या पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. इस्रायलमध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार केले जाते. या तंत्रज्ञानाला डिसेलिनेशन म्हणतात. इस्रायल देखील समुद्राने वेढलेला असून, तिथेही पाण्याची समस्या आहे. पण, तिथे समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार केले जाते. लक्षद्वीपमधील वाढत्या पर्यटनामुळे तिथे डिसेलिनेशन तंत्रज्ञान खूप महत्वाचे सिद्ध होऊ शकते.
भारत-मालदीवमध्ये तणाव का वाढला?पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी अलीकडेच लक्षद्वीपचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भारतीयांना लक्षद्वीपला येण्याचे आवाहन केले. यानंतर मालदीव सरकारचे मंत्री मरियम शुआन यांनी सोशल एक्सवर पंतप्रधान मोदींबाबत अपमानास्पद शब्द वापरले. शुआनाच्या या अश्लील टिप्पणीचा भारतीयांनी जोरदार विरोध केला. यानंतर सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंड होत आहे.
मालदीव सरकारने मंत्र्यांना निलंबित केलेयानंतर मालदीवच्या मुजजू सरकारने पंतप्रधान मोदींवर भाष्य करणारे तीन मंत्री मरियम शुआन, मालसा आणि हसन जिहान यांना निलंबित केले. सध्या सोशल मीडियावर बहुतांश सेलेब्रिटी आणि नेटीझन्स लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन करत आहे.