India Maldives Row:भारताचा शेजारील देश मालदीवमध्ये सत्तांतर झाल्यापासून दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या मालदीवला याचा मोठा फटका बसला आहे. यातच आता मालदीवच्या जमहूरी पक्षाचे (जेपी) नेते कासिम इब्राहिम यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना पंतप्रधान मोदी आणि भारतातील लोकांची माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.
न्यूज एजन्सी एएनआयने स्थानिक मीडिया हाऊस व्हॉईस ऑफ मालदीवच्या हवाल्याने म्हटले की, मालदीवच्या तीन नेत्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती, त्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले. भारतात तर बॉयकॉट मालदीव अजूनही ट्रेंडमध्ये आहे. अशातच कासिम इब्राहिम यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.
काय म्हणाले कासिम इब्राहिम?मालदीवचे विरोधी पक्षनेते म्हणाले, “कोणत्याही देशाबाबत, विशेषत: शेजारी देशाबाबत संबंधांवर परिणाम होईल, असे वक्तव्य केले जाऊ नये. आपल्या देशाप्रती आपल्या जबाबदाऱ्या आहेत, ज्याचा आपण विचार केला पाहिजे. मी मुइज्जूला सांगू इच्छितो की, देशाचे नुकसान होईल, असे काही करू नये. चीन भेटीनंतर भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्याविषयी केलेल्या टिपण्णीबद्दल मुइज्जूंनी भारताची औपचारिक माफी मागावी, असे आवाहन करतो," असं कासिम इब्राहिम म्हणाले.