Canada vs India: भारत आणि कॅनडामधील राजकीय संबंधांमधील तणाव सातत्याने वाढत आहे. भारत सरकारने कॅनडाला पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिले आहे. कॅनडा सरकारच्या आरोपांबाबत भारताने म्हटले आहे की, ट्रुडो सरकार कोणतेही पुरावे सादर न करता सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून हे ट्रूडो ( Justin Trudeau ) यांचा राजकीय डाव असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, रविवारी कॅनडातून एक राजकीय संदेश प्राप्त झाला, ज्यामध्ये कॅनडात उपस्थित भारतीय उच्चायुक्त आणि राजनयिकांना एका प्रकरणात 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्णन केले आहे. म्हणजेच कॅनडाचे सरकार या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त आणि मुत्सद्दींना संशयित मानत आहे. ते कोणत्या प्रकरणात संशयित आहे, हे सांगण्यात आले नसले तरी हे संपूर्ण प्रकरण दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.
कॅनडा सरकारच्या या तथ्यहीन आरोपांवर भारताने जोरदार टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ट्रूडो सरकारने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे त्यांच्या राजकीय अजेंडामुळे असे निराधार आरोप करून भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भारताने ट्रूडो सरकार वर केले. तसेच, ट्रूडो सरकार व्होटबँकच्या राजकारणासाठी हा प्रकार करत असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ट्रूडो यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये बिनबुडाचे आरोप केल्यापासून, कॅनडाच्या सरकारने एकही पुरावा सादर केलेला नाही. भारत सरकारने या प्रकरणी अनेकवेळा पुराव्याची मागणी केली आहे. MEAने म्हटले आहे की ट्रूडो सरकारने हे पाऊल चर्चेनंतर उचलले आहे, ज्यात त्यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे किंवा तथ्ये सादर केलेली नाहीत. निज्जर हत्याकांडाची सखोल चौकशी करणे अपेक्षित आहे, पण ट्रूडो सरकार भारताची प्रतिमा मलिन करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय भारताने व्यक्त केला आहे.