न्यूयॉर्क - काश्मीर प्रश्नावरून कुठलाच देश साथ देत नसल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता या प्रश्नावरून सरेंडर केले आहे. मंगळवारी आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये इम्रान खान यांची अगतिकता स्पष्टपणे दिसून आली. आम्ही भारतावर हल्ला करू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी अगतिकता व्यक्त केली. मी सध्या अत्यंत कठीण काळामधून एकीकडे भारत आहे तर दुसरीकडे इराण आहे, माझ्या जागी अन्य कुणी असता तर त्याला हार्ट अॅटॅक आला असता, असे इम्रान खान म्हणले. न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात इम्रान खान यांना काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली. तसेच चीनमधील उईगर मुस्लिमांच्या परिस्थितीबाबतही विचारणा झाली. यावेळी इम्रान खान यांनी चीनबाबत मौन बाळगले. मात्र पाकिस्तानचे दु:ख जगासमरो मांडण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान म्हणाले, ''चीनबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. तसेच काही मुद्द्यांवर बोलायचे झाल्यास आम्ही खासगीत बोलतो. आता जरा तुम्ही विचार करा ज्या व्यक्तीने 13 महिन्यांपूर्वी देशाची सत्ता सांभाळली आहे. त्याचा देश आर्थिक मंदीशी झुंजत आहे. तो कुठे कुठे म्हणून लक्ष देईल. एकीकडे अफगाणिस्तान, इराण आणि सौदी अरेबियाकडे लक्ष द्यायचे आहे. अमेरिका आहेच.आता सीमेवर अफगाणिस्तानसोबत तणाव आहे. अफगाणिस्तानबाबतसुद्धा काही प्रश्न आहेत. तसेच भारताबाबतसुद्धा वाद सुरू आहे.'' ''मला वाटते माझ्यासमोर अजून खूप प्रश्न आहेत. तुम्ही पण हे मान्य कराल. जर तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते. मला माहीत आहे की अशा परिस्थितीत आतापर्यंत तुम्हाला हार्ट अॅटॅक आला असता.'' असे इम्रान खान यांनी पुढे सांगितले. क्रिकेटच्या मैदानात खेळायला उतरताना 90 हजार प्रेक्षक आपल्याला पाहत असल्याने एक वेगळ्या प्रकारचा दबाव येतो. हा दबाव तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कणखर बनवतो. या कणखर व्यक्तिमत्त्वामधूनच मला बरेच काही शिकता आले आहे,' असेही इम्रान खान यांनी पुढे सांगितले.
एकीकडे भारत, दुसरीकडे इराण; माझ्या जागी दुसरा असता तर त्याला हार्ट अॅटॅक आला असता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 1:58 PM