इस्लामाबाद : पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्याचवेळी त्यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत चिंता व्यक्त केली. येत्या काही दिवसात इस्लामाबाद येथे होत अससेल्या सार्क देशांच्या परिषदेत भारतानेही सहभागी व्हावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताचे पाकिस्तानातील राजदूत अजय बसारिया यांनी शुक्रवारी इम्रान खान यांची सदिच्छा भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने शुभेच्छा दिल्या.यावेळी बसारिया म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ या पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दूरध्वनी करून इम्रान खान यांचे अभिनंदन केले होते. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सकारात्मक दिशेने पुढे जातील, अशी आशा भारतात निर्माण झाली आहे.३० जुलै रोजी मोदी यांनी इम्रान खान यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पाकसोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा निसंदिग्ध शब्दात बोलून दाखविली होती. संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी पुढे येत संयुक्त धोरण आखले पाहिजे, असे त्यावेळी मोदी म्हणाले होते.त्यावेळी इम्रान खान यांनी दोन्ही देशांनी संवादातून वादांवर तोडगा काढला पाहिजे, असे मत नोंदवले होते. दोन्ही देशांनी एकत्र येत लाखो नागरिकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले पाहिजे, असेही इम्रान खान म्हणाले होते. (वृत्तसंस्था)>भारताचे पाकिस्तानातील राजदूत अजय बसारिया यांनी शुक्रवारी इम्रान खान यांची सदिच्छा भेट घेत भारतीय क्रिकेटपटंूच्या स्वाक्षऱ्या असलेली एक बॅट खान यांना भेट म्हणून दिली.
सर्व प्रश्नांवर भारत-पाक चर्चा होणे गरजेची
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 3:44 AM