लाहोर : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा पाकिस्तान दौरा दोन्ही देशांसाठी सकारात्मक ठरणार असून, त्यामुळे दोन शेजारी देशांमधील तणाव कमी होण्यास मदत होईल, असे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांनी म्हटले.
इस्लामाबादमध्ये १५ आणि १६ ऑक्टोबरला होणाऱ्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेसाठी जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. २००२ ते २००७ पर्यंत पाकचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलेले कसुरी म्हणाले की दोन्ही देशांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे. संवाद पुन्हा सुरू केल्याने तणाव कमी होईल आणि रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्क पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.
मोठ्या तणावाच्या दरम्यान इस्रायल गाझा व लेबनॉनच्या लोकांना लक्ष्य करत आहेत. यादरम्यान पाकिस्तान आणि भारताला तणाव कमी करण्यासाठी एकत्र आणले जात असावे, असे त्यांनी म्हटले आहे.
इम्रान यांचा पक्ष राहणार दूर
एस जयशंकर यांच्या भेटीवर इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयच्या नेत्यांनी दूर राहणे पसंत केले असून, आमच्या राजकीय संघर्षात अन्य कोणत्याही देशाची भूमिका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाचा संघर्ष हा अंतर्गत मुद्दा आहे ज्यामध्ये जयशंकर यांचा कोणताही सहभाग नाही, असे अध्यक्ष बॅरिस्टर गौहर अली खान यांनी म्हटले आहे.
डिनर कुणासोबत, हुकूमशहा की सोरोस?
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एका कार्यक्रमादरम्यान उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन की अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यासोबत रात्रीचा डिनर करण्यास आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अतिशय हुशारीने हसत हसत “आता नवरात्रीची वेळ आहे मला उपवास करायला आवडेल.”, असे ते म्हणाले. त्यांचे हे उत्तर व्हायरल होत आहे.