१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. यानंतर काही जणांनी भारतातूनपाकिस्तानात जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, तर काही लोक भारतातच राहिले. फाळणीच्या सात दशकांनंतर आता दोन्ही देशांची कहाणी वेगळी आहे. एक देश आपल्या प्रगतीच्या जोरावर जगात आपलं सर्वोच्च स्थान निर्माण करत आहे. तर दुसऱ्या देशात आर्थिक दिवाळखोरीचा धोका तर कधी सत्तापालटाची भीती.
अशा परिस्थितीत ज्यांच्या पूर्वीच्या पिढीनं फाळणीच्या वेळी पाकिस्तानची निवड केली त्यांचे काही वंशज आता त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. असाच एक व्यक्ती म्हणजे सयान अली. सायन अली अमेरिकेत राहतो आणि मूळचा पाकिस्तानी आहे. इतकंच नाही तर अनेकदा भारताची स्तुती करताना व्हिडीओ शेअर करतो. यापूर्वी पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमीनेही आपल्या आजोबांनी भारत सोडण्यावर प्रतिक्रिया देत 'दादाजी ने वाट लगा दी' असं लिहिलं होतं.
सयाननं आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. तिरंग्यासोबत असलेल्या त्याच्या या फोटोला अनेक लाईक्स आणि शेअर्स मिळत आहेत. त्यानं यासोबत एक पोस्टही शेअर केलीये. “पाकिस्तान अशी जगात कोणती जागा नाही. जगाला याची गरज होती म्हणून नाही, तर धर्माच्या आधारे पाकिस्तानची स्थापना करण्यात आली होती. माझ्या आजी आजोबांनी भारताशिवाय पाकिस्तानची निवड केली कारण ते मुस्लिम होते. पाकिस्तानात जाणं माझ्या आजी आजोबांची सर्वात मोठी चूक होती,” असं त्यानं लिहिलंय.
भारतात असतो तर…
“जर मी पाकिस्तान ऐवजी भारतात असतो, तर सुरक्षेच्या कारणास्तव मला देश सोडवा लागला नसता, हिंदु मुस्लीम कधी शत्रू नव्हते. काही समाजकंटक त्यांना वेगळं करू पाहत होते. बाहेरच्या शक्ती अखंड भारताला पाहून घाबरल्या. दुर्देवानं त्या सुंदर आणि कदाचित सर्वात शक्तिवान देशाला विभाजीत करण्यात यशस्वी ठरल्या,” असंही सयान म्हणाला.