Nawaz Sharif On India-Pakistan Relations : मागील काही वर्षंपासून भारत आणि पाकिस्तानमधील सर्वप्रकारचे संपुष्टात आले आहेत. पण, गरिबीने त्रस्त झालेल्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी आशा आहे. पाकिस्तानने अनेकदा दोन्ही देशांमधील व्यापारीक संबंध पुर्ववत करण्याची विनंती केली आहे, मात्र भारताकडून त्याला कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. अशातच, SCO शिखर परिषदेसाठी पाकिस्तानात गेलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीनंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारत-पाक संबंधापर महत्वाचे वक्तव्य केले आहे.
नवाझ शरीफ यांनी गुरुवारी (17 ऑक्टोबर) पाकिस्तानात भारतीय पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जयशंकर यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी ही तर सुरुवात असल्याचे म्हटले. तसेच, भारत आणि पाकिस्तान भूतकाळ सोडून भविष्याचा विचार करतील अशी आशा व्यक्त केली. नवाझ शरीफ म्हणाले, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानात यावे, अशी आमची इच्छा होती. पण, त्यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पाठवले, त्याचाही आम्हाला आनंद आहे. आता कुठे नवी सुरुवात झाली आहे.
भूतकाळात डोकावू नका, भविष्याकडे वाटचाल करा. भूतकाळात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्या व्हायला नको होत्या. भविष्यात अनेक शक्यता आहेत, त्याकडे पाहिले पाहिजे. जिथे संबंध थांबले होते, तिथूनच पुन्हा सुरू करण्याची आमची इच्छा आहे. आपण आता भूतकाळ सोडून भविष्याकडे पाहिले पाहिजे. आम्हाला आता सकारात्मक पावले उचलायची आहेत, एक नवीन सुरुवात करायची आहे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.
शरीफ पुढे म्हणतात, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आता व्यापार, हवामान बदल, व्यवसाय, उद्योग, क्रीडा इत्यादी क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. 75 वर्षे अशीच वाया गेली, आता आणखी 75 वर्षे वाया घालवायचे नाही. क्रिकेटमधील भूतकाळातील चुकांमधून धडा घेतला पाहिजे. भारताने चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी आपला संघ पाठवावा. एकमेकांचे संघ एकमेकांच्या देशात न पाठवून काय मिळणार? भारतीय संघाने पाकिस्तानात यावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. आपली (भारत-पाकिस्तान) संस्कृती, परंपरा, भाषा, खाद्यपदार्थ समान आहेत. आपल्या नेत्यांचे संबंध चांगले नसतील, पण देशातील लोकांचे नाते खूप चांगले आहे.