काबुल:अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानकडूनभारताला धोका असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तालिबान पाकिस्तान आणि इतर दहशतवादी संघटनांसोबत मिळून भारताविरोधात कारवाया करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, तालिबानचा नेता शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत स्टनिकझाई म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकाळ चालणाऱ्या भौगोलिक आणि राजकीय वादाची आम्हाला जाणीव आहे. पण, भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत वादात अफगाणिस्तानचा वापर करू नये, असं स्पष्ट मतही स्टनिकझाईने व्यक्त केलंय. तसेच, तालिबानला शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत, अशीही माहिती त्याने दिली. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमध्ये शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाईवर परराष्ट्र व्यवहार खात्याची जबाबदारी येऊ शकते.
'मीडियातील बातम्या चुकीच्या'तालिबान सरकारला भारताबद्दल पूर्ववैमनस्यपूर्ण शत्रुत्व असण्याची किंवा पाकिस्तानच्या संगनमतानं भारताला लक्ष्य करण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, स्टनिकझाई म्हणाला की, प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. आम्ही अशाप्रकारचे विधान कधी केलंच नाही. आम्हाला आमच्या शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत, असेही तो म्हणाला.
भारताने त्यांचे प्रोजेक्ट पुर्ण करावेदरम्यान, यापूर्वीही तालिबानचा प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाला होता की, तालिबानला अफगाणिस्तानमधील भारताच्या विकास प्रकल्पाबाबत कधीच तक्रार नव्हती. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांत भारतानं केलेल्या विकासकामांवर - रस्त्यांपासून धरणं आणि अगदी संसदेच्या इमारतीपर्यंत तालिबान बंदी घालेल अशी भीती होती. पण, शाहीन म्हणाला की, अफगाणी लोकांच्या हिताशी संबंधित प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत, आम्ही यात कुठला अडथळा आणणार नाही.