इस्लामाबाद - पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारतासी चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव्य पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. याबाबत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी य.यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत वाटाघाटी करण्यासाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे.'' बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. तत्पूर्वी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. जखमी अवस्थेतील वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. त्यानंतर भारताने आपला एक वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असून, जिनिव्हा करारामधील तरतुदींनुसार त्याची सुटका करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास तयार - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 2:40 PM