चेन्टिली (फ्रान्स) - गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा मुद्दा ठरलेल्या काश्मीर प्रश्नावर फ्रान्सने पुन्हा एकदा भारताला साथ दिली आहे. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेतूनच सुटला पाहिजे. या भागात कुठल्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करता कामा नये, असे वक्तव्य फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूल मॅक्रॉ यांनी केले आहे. सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूल मॅक्रॉ यांच्यात नुकतीच भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना मॅक्रॉ यांनी सांगितले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेदरम्यान त्यांनी नुकत्याच जम्मू-काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या निर्णयाची कल्पना दिली. तसेच हा प्रश्न भारताच्या सार्वभौमत्वाशी संबंधित असल्याचे सांगितले. त्यानंती मी त्यांना सांगितले की, काश्मीर प्रश्नाबाबत दोन्बी देशांनी चर्चेतून तोडगा काढला पाहिजे. या भागात कुठल्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करता कामा नये. तसेच हिंसाचार होईल अशी पावले उचलता कामा नयेत.''दरम्यान, भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल विमान करारापैकी पहिले विमाने पुढील महिन्यात भारताला देण्यात येईल, असेही मॅक्रॉ यांनी यावेळी सांगितले.
काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ, द्विपक्षीय चर्चेतून तोडगा काढण्याचा दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 9:16 AM