बिजींग, दि. 10 - चीनच्या सरकारी मालकीच्या वर्तमानपत्रांमधून भारताला दररोज धमक्या आणि इशारे देण्याची मालिका सुरुच आहे. आता पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या लेखातून भारताला उपदेशाचा डोस पाजण्यात आला आहे. डोकलाममध्ये जो संघर्ष सुरु आहे त्यातून भारताची भूराजनैतिक महत्वकांक्षा दिसून येते. भूतानच्या संरक्षणाच्या नावाखाली भारताचे स्वत:चे महासत्ता बनण्याचे स्वप्न दडले आहे अशी टीका लेखातून करण्यात आली आहे.
डोकलामचा तिढा सोडवण्यासाठी भारताने तात्काळ आपले सैन्य तिथून मागे घ्यावे असा सल्ला देण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे डोकलाम हा चीनचा भूभाग असून तिथे भारतीय सैन्याने घुसखोरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. जूनच्या मध्यपासून दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. डोकलाम भूतानच्या हद्दीत येते पण डोकलाम आपल्या हद्दीत येते असा चीनचा दावा आहे. भारताला आशियामध्ये वर्चस्व गाजवायचे आहे. भारत चीनकडे आपल्या सुरक्षेसाठी एक गंभीर धोका म्हणून पाहतो असे लेखात म्हटले आहे. भूतानला मदत करण्याच्या नावाखाली चीनने जे पाऊल उचलले आहे त्याने फक्त चीनच्या हद्दीचेच उल्लंघन होत नाहीय तर, भूतानच्या अखंडतेला आणि स्वांतत्र्यालाही धोका निर्माण झाला आहे असे लेखात लिहीले आहे.
चीनचा संयम संपत चालला आहे. भारत आगीबरोबर खेळतोय हे लक्षात घ्यावे, हात जळल्याशिवाय रहाणार नाहीत असे लेखात म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी ग्लोबल टाइम्समधून कुठल्याही परिस्थितीत चीन युद्धाचे पाऊल उचणार नाही असा भारताचा विश्वास असेल तर, भारताचे विश्लेषण हे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि लष्करी विज्ञानाला धरुन नाही. नरेंद्र मोदी सरकारने चीनच्या इशा-याकडे दुर्लक्ष करु नये अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि युद्ध अटळ असेल अशी धमकी पुन्हा एकदा ग्लोबल टाइम्सच्या लेखातून देण्यात आली आहे.
ग्लोबल टाइम्स हे चिनी सरकारच्या मालकीचे वृत्तपत्र असून त्यात जे छापून येते त्याकडे चीन सरकारची अधिकृत भूमिका म्हणून पाहिले जाते. सिक्कीम सीमेजवळच्या डोकलाममध्ये संघर्ष निर्माण झाल्यापासून ग्लोबल टाइम्सच्या लेखातून अनेकदा भारताला युद्धाची धमकी देण्यात आली आहे.