नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेत (ECOSOC) संबोधित करताना भारताच्या विकासाचा आलेखच जगासमोर मांडला. यावेळी, केवळ मोदी सरकारच्या कार्यकाळातील विकासकामांचा उल्लेख न करता, जगाच्या विकासात भारताच्या योगदानाबद्दल भाष्य केलं. भारताने कोरोनाच्या लढाईत दिलेलं योगदान, आणि जगभरातील देशांना केलेल्या वैद्यकीय मदतीचा उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला.
कोरोना व्हायरससंदर्भात बोलताना, भारताचा रिकव्हरी रेट सर्वात चांगला असल्याचे मोदींनी म्हटले. कोरोनाची लढाई आम्ही जनआंदोलन केली, त्यामुळे या संकटाचा सामना सर्वांनीच मोठ्या हिंमतीने आणि कष्टाने केला. याचा परिणाम म्हणूनच भारताचा रिकव्हरी रेट जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे मोदींनी सांगितले.
जगातील विकासात भारताच्या योगदानाचा उल्लेख करताना, भूकंप असो, चक्रीवादळ असो वा इबोलाचे संकट असो किंवा इतर मानवनिर्मित संकट असो. भारताने मोठ्या हिमतीने त्याचा सामना केला आहे. कोरोनाच्या लढाईत भारताने 150 पेक्षा अधिक देशांत वैद्यकीय मदत पोहोचवली आहे. भारताने गतीमानता व एकता दाखवत संकटांना तोंड दिल्याचे मोदी म्हटले.
आपल्या भाषणात देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचा निवारा देण्यात येत असल्याचंही मोदंनी सांगितलं. भारत देश आपल्या 75 व्या स्वातंत्र्यप्राप्त वर्षाचा सोहळा आयोजित करेल, तेव्हा हाऊसिंग फॉर ऑल 2022 कार्यक्रमांतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाच्या डोक्यावर छत असेल, असे मोदी म्हणाले. देशातील 6 लाख गावांमध्ये स्वच्छता करुन, आम्ही महात्मा गांधी यांची 150 व्या जयंती साजरी केली. दरम्यान, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्रात सुधारणेला वाव असल्याचंही मोदी म्हणाले.